Coronavirus : आम्ही जगायचे कसे ? कष्टकरी, कामगार वर्गाचा आर्त सवाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

रोजंदार वर्गाचे काय ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देश "लॉकडाऊन" करण्याचा निर्णय जाहिर केला. त्यानंतर नागरीकांची जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी किराणा दुकानांवर अक्षरश: झुंबड उडाली. नोकरदार, हातात पैसे असणाऱ्यांनी बाजारातून तत्काळ वस्तू खरेदी केल्या. मात्र, ज्यांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर किंवा आठवडयला मिळणाऱ्या पगारावर अवलंबून आहे. त्यांच्यावर परिस्थितीसमोर हतबल होण्याची वेळ आल्याचे वेदनादायी चित्र दिसत आहे.

पुणे - पावभाजीच्या स्टॉलवर मी कामाला जाते, तिथे भांडी घासण्याचे काम करते. रोज त्याचे ३५० रुपये मिळतात. पण कोरोनामुळे स्टॉल बंद झाला. आता पैसे नाहीत. घरातील रेशन संपले आहे. त्यामुळे घरातील ८-१० जणांचे पोट भरायचे कसे ? तुम्हीच सांगा आता आम्ही जगायचे कसे ? असा प्रश्न घोरपडे पेठेत राहणाऱ्या रेखा चौधरी यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्यासारख्या  हजारो गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या नागरीकांचे आता जगणे अक्षरश: मुश्किल झाल्याचे भयावह वास्तव पुढे येऊ लागले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

खासगी कारवर चालक म्हणून काम करणाऱ्या दशरथ उघडे यांचीही परीस्थिती यापेक्षा वेगळी नाही. खडकवासल्याजवळ राहणारे उघडे हे खासगी कारवर चालक म्हणून काम करतात उघडे यांच्या कुटुंबातही ८- १० जण आहेत. त्यांचा उदरनिर्वाह उघडे यांच्या पगारातून होतो. परंतु, कोरोनामुळे शहरात संचारबंदी आहे. त्यामुळे उघडे यांच्या गाडीची चाकेही गेल्या ५ दिवसापासून थांबली आहेत. ३-४ दिवस पुरेल एवढेच धान्य त्यांच्याकडे आहे.  या परिस्थितीमध्ये कुटुंबाला घेऊन गावी जाणे हा एकमेव पर्याय त्यांच्या पुढे होता. मात्र संचारबंदी, पैशांची चणचण आदी कारणांमुळे त्यांचे गावाकडे जाण्याचे दोरही आता कापले गेले आहेत. त्यामुळे "घरातील इतक्या लोकांचे पोट कसे भरु, कदाचित ही संचारबंदी वाढली, तर कसे जगायचे असा प्रश्न उघडे यांनी उपस्थित केला आहे.

Coronavirus : पुण्यात ९५० ठिकाणी पालिकेकडून फवारणी

घरकामगार, कचरावेचक, गवंडी, मजूर, छोटे-मोठे विक्रेते, कारचालक, ट्रक, बसचे ड्रायव्हर, क्लीनर अशा हातावर पोट असणाऱ्या एका मोठ्या समुदायाची आतापासूनच जगण्यासाठीची धडपड सुरु झाली आहे. आणखी ४-५ दिवस ते कसे तरी या परीस्थितीशी तोंड देऊ शकतील. त्यानंतर पुढचे २० दिवस त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नसल्याचे एक दुर्दैवी चित्र दिसू लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How do we survive is the question of the working class