पुणे जिल्ह्यात आजपासून उद्योगाची चाके फिरणार; कंपन्यांवर काही अटी आणि शर्तींचे बंधन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

कोरोना बाधितांची संख्या कमी असलेल्या क्षेत्रातील उद्योगांना वीस एप्रिलपासून परवानगी देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. 

पुणे - पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी वगळून पुणे जिल्ह्यातील काही भागात सर्व क्षेत्रातील उद्योगांना काही अटी आणि शर्तींवर आजपासून (सोमवार) परवानगी देण्यात येणार आहे. ती देताना ते कोरोनाबाधित क्षेत्र नाही, तसेच स्थानिक आणि कमीत कमी कर्मचारी वर्ग या प्रमुख अटी त्यामध्ये राहणार आहेत.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. तो तीन मेपर्यंत राहणार आहे. परंतु कोरोना बाधितांची संख्या कमी असलेल्या क्षेत्रातील उद्योगांना वीस एप्रिलपासून परवानगी देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर उद्योग विभागाचे सहसंचालक एस. एस. सुरवसे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ही माहिती दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी वगळता काही भागातील उद्योगांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी स्वतंत्र वेबपोर्टल तयार करण्यात येत असून, त्या माध्यमातून ही परवानगी देण्यात येणार आहे. ती देताना ज्या ठिकाणी कंपनी आहे, त्याच ठिकाणचे कामगार आहेत, अथवा कंपनीच्या कॉलनी, गेस्ट हाऊसमध्ये कामगार आहेत. त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. अन्य शहरातून अथवा ठिकाणाहून कामगारांची ने-आण करण्यास परवानगी दिली जाणार नाही. कामाच्या ठिकाणीदेखील पुरेशी काळजी घेऊन आणि सामाजिक अंतर ठेवून काम करण्याचे बंधन राहणार आहे.

पहिल्या टप्प्यात आवश्‍यक तेवढ्याच कामगारांना परवानगी दिली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने ती वाढविण्यात येणार आहे. तसेच संबंधित कंपनीला आवश्‍यक तेवढ्या कच्च्या मालाची वाहतूक करण्यासाठीदेखील परवानगी देण्यात येणार आहे, असेही सुरवसे यांनी "सकाळ'ला सांगितले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील काही भागातील बंद पडलेले उद्योग सुरू होण्याची मार्ग मोकळा झाला आहे.

1) परवानगीसाठी येथे करा अर्ज
जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने उद्योगांना परवानगी देण्यासाठी स्वतंत्र वेबपोर्टल तयार केले आहे. Permission.midcindia,org या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर छाननी करून, उद्योगांना परवानगी दिली जाणार आहे.

2) कंपन्यांसाठी अटी व शर्ती
-स्थानिक कामगार हवेत.
-कामगारांची ने- आण करण्यास परवानगी नाही
-पहिल्या टप्प्यात आवश्‍यक तेवढ्याच कामगारांना परवानगी
-सामाजिक अंतर ठेवून काम करण्याचे बंधन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: industry sectors in some parts of Pune district will be allowed to the terms and conditions of the day