Video : भुकेलेल्यांसाठी धावला जैन समाज; मुक्‍या जनावरांचीही भागविली भूक

सुवर्णा नवले
Monday, 20 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू असल्याने अनेकांना उपाशीपोटी राहावे लागत आहे. या बिकट परिस्थितीत शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने भुकेलेल्यांना सकस जेवण पुरविले जात आहे. दररोज दीड हजाराच्यावर गरजूंना सकाळी व संध्याकाळी पोटभर भोजन देण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

पिंपरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू असल्याने अनेकांना उपाशीपोटी राहावे लागत आहे. या बिकट परिस्थितीत शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने भुकेलेल्यांना सकस जेवण पुरविले जात आहे. दररोज दीड हजाराच्यावर गरजूंना सकाळी व संध्याकाळी पोटभर भोजन देण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

उद्योगनगरीत राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातील कामगार, विद्यार्थी यांना पिंपरी-चिंचवड सकल जैन मूर्ती पूजक समाज, आकुर्डी, निगडी, प्राधिकरण येथील वर्धमान जैन श्रावक संघ व पिंपरी -चिंचवड विहार सेवा यांच्या वतीने जेवण व्यवस्था केली आहे. संतोष लुंकड यांच्या मदतीने सर्व व्यवस्था सुरळीत पार पाडली जात आहे. जवळपास दिवसाचा तीस हजार रुपये खर्च अन्नदानासाठी येत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरभरात अन्न वाटपासाठी कार्यकर्ते नियुक्त करण्यात आले आहेत. भोजन व्यवस्थेसह केळी व शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील उद्योजक संतोष कर्नावट, जयकुमार चोरडिया यांनी या कार्यासाठी विशेष योगदान दिले आहे. आकुर्डी स्थानक अध्यक्ष जवाहर मुथ्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. भोजन व्यवस्था पोचविण्यासाठी विशेष वाहन व्यवस्था विहार सेवा ग्रुपच्या सदस्यांकडून स्वयंस्फूर्तीने देण्यात आली आहे. अत्यावश्‍यक सेवेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याने ज्या भागात गरजूंना भोजन हवे आहे त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन पी.सी.एम.सी. विहार सेवा अध्यक्ष भद्रेश शहा यांनी केले आहे.

वितरण व्यवस्थेचे कौतुक
भोजन वितरण व्यवस्थेत मनीष सोनिग्रा, विवेक जैन, तुषार रांका, प्रवीण सोनिग्रा, राजेश पटणी, राहुल लुंकड, संतोष मुथ्था, दर्शन लुंकड, मुकेश शहा, जिनेश जैन, मनोज पोरवाल, अमूल हुंडिया, भरत कवाड व नीलेश जैन यांच्यासह 80 जणांनी मदत केली आहे. आकुर्डीतील जैन स्थानकात भोजन बनविले जात असून स्वछता व सुरक्षिततेची काळजी घेऊन वाटप केले जात आहे. या कार्यामुळे अनेक गरजूंना आधार मिळत असल्याने सर्वांनी सकल जैन समाजाचे आभार मानले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Jain community ran for the hungry people and cattle