Coronavirus : मजूर हवालदिल; पैसे संपल्याने उपासमारीची वेळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

त्यांच्यासाठी शिवभोजनच्या धर्तीवर जेवणाची सरकारने सोय करावी. त्यासाठी दोन कामगारांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याचे आश्‍वासन आम्ही सरकारला दिले. मात्र सुरक्षित अंतर राखण्याच्या मुद्‌द्‌यावरून सरकारने हा प्रस्ताव फेटाळला. काहींनास्वयंसेवी संस्थांकडून एक वेळचे जेवण मिळते. रात्री हे कामगार केवळ पाणी पिऊन झोपत आहेत. यासंदर्भात पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याने मंगळवारपासून घरीच उपोषणाला बसणार आहे.
- जयंत शिंदे, संस्थापक, बांधकाम कामगार सेना

पिंपरी - लॉकडाउनमुळे शहरात हजारो मजूर अडकून पडले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मैलावरून आलेले हे मजूर हवालदिल झाले आहेत. आता कंत्राटदार गायब, हातातील पैसे संपलेले अशा स्थितीत सर्व जण कामाच्या ठिकाणी बसून आहेत. गावाकडे जाता येत नाही आणि पोटातील आग थांबत नाही. असे सगळे बेचैन करणारे चित्र बांधकाम प्रकल्प आणि मोकळ्या जागांवर ठोकलेल्या पालांवर आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या आधी विविध बांधकामांच्या प्रकल्पांसह रस्ते दुरुस्ती, छोट्या पुरवठादार कंपन्या याठिकाणी हे मजूर हजारोंच्या संख्येने काम करत होते. हा वर्ग महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्यासह कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमधील आहे. यातील अनेकजण कुटुंबासह अनेक महिन्यांपासून येथे काम करतात. गेल्या महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे देशात लॉकडाउन जाहीर झाला. परिणामी अनेकांनी आपापल्या गावाची पायी वाट धरली. 

आता जे येथे राहिलेले आहेत त्यांची संख्या हजारांत आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांचे हाल सुरू आहेत. मजुरीचे पैसे संपलेले आहेत. शहरामध्ये अनेक स्वयंसेवा संस्था, व्यक्ती अन्नदान, शिधावाटप करत आहेत. मात्र, त्यांच्यापर्यंत कोणी पोचलेले नाही. कारण त्यांना अशा मजुरांच्या वस्त्या माहीत नाहीत. तसेच कोरोनापासून बचाव असाही हेतू यामागे आहे. मजूर तर आपले राहते ठिकाण सोडून बाहेर पडू शकत नाहीत. पोलिस मारतील किंवा चोर म्हणून लोक मारतील अशीही भीती त्यांच्या मनात आहे. 
याबाबत भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष इरफान सय्यद म्हणाले, ‘‘जे कामगार साइटवर आहेत, त्यांना सरकारकडून जेवण मिळते. मात्र, अड्ड्यांवर उभे राहून काम मागणाऱ्या कामगारांच्या जेवणाची कोणतीही ठोस उपाय नाहीत. त्यामुळे त्यांचे जास्त हाल होत आहेत. शहरात बांधकामाच्या साइटसह अन्य साइटवर काम करणारे सुमारे ४० ते ५० हजार कामगार आहेत. भोसरी, निगडी, पिंपरी अशा अड्ड्यांवर काम करणाऱ्यांची संख्याही २० हजारांच्या घरात आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Labor intensive by no money