Coronavirus : परतशील कधी पुन्हा...?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून १७०० हून अधिक सराफ आहेत. या सर्वांकडे मिळून सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार कारागीर आहेत. त्यापैकी पश्‍चिम बंगाल आणि गुजरातमधील सर्वाधिक तर राजस्थानमधील काही कारगीर आहेत. तीस ते चाळीस टक्के आपल्या घरी गेले आहेत. ते पुन्हा कामावर येऊन सर्व व्यवहार सुरळीत होण्यास किमान तीन ते चार महिन्यांचा कालवधी लागेल.
- फत्तेचंद रांका , अध्यक्ष, पुणे सराफ असोसिएशन

गावी गेलेल्या मजुरांवर भिस्त; सावरण्यासाठी हवीत सहा महिने
पुणे - लॉकडाउन मागे घेतल्यानंतर पुण्याला सावरण्यासाठी किमान ऑगस्ट महिना उजाडेल. सर्व क्षेत्रात स्थलांतरीत कामगार गावी परतल्याने आणि कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात भिती बसल्यामुळे किमान एवढा कालवधी त्यासाठी जाईल, असेही या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई खालोखाल राज्यात सर्वाधिक रोजगार देणारे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. देशभरातील सतराहून अधिक राज्यातील तीन ते चार लाख स्थलांतरीत मजूर रोजगारासाठी या शहरात आहेत. त्यापैकी जवळपास ५० ते ६० टक्के मजूर हे आपल्या घरी परत गेले आहेत. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. त्यानंतरही तो किती दिवस वाढेल, हे सांगणे शक्‍य नाही. परिणामी हे मजूर परतणार का?, परत येणार तर कधी येणार? असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर व्यवहार सुरळीत होण्यासाठी किमान चार ते सहा महिने वेळ द्यावा लागेल, असा अंदाज विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

‘‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड व उपनगराच्या परिसराततील पन्नास ते साठ टक्के मजूर गावी गेले आहेत. उर्वरित मजूर हे पुण्यात अडकून पडले आहेत. लॉकडाउन किती दिवस राहील, हे सांगता येत नाही. त्यामुळे गावी गेलेले मजूर हे परत येण्यासाठी किमान दोन ते तीन महिने लागतील,’’ असे अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार म्हणाले. ‘क्रेडाई’च्या लेबर कमिटीचे अध्यक्ष जयप्रकाश श्रॉफ म्हणाले, ‘‘बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांची संख्या ही जवळपास एक ते सव्वा लाख एवढी आहे. त्यापैकी किमान तीस ते पस्तीस हजार मंजूर हे परराज्यात आपल्या गावी गेले आहेत. पूर्ण क्षमतेने बांधकामे सुरू होण्यास किमान सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागेल, असा आमचा अंदाज आहे.’’ 

‘‘पुणे शहर आणि परिसरात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांपैकी सत्तर ते ऐंशी टक्के वर्ग हा परराज्यातील आहे. ते पुन्हा गावावरून येण्यास आणि नियमितपणे हॉटेल व्यवसाय सुरू होण्यास किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे,’’ असे पुणे हॉटेल असोसिएशनचे माजी सहसचिव माधव वझे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lobour go to village by coronavirus