अत्यवस्थ, उशिरा दाखल केल्याने ससूनमध्ये सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक मरण पावलेले रुग्ण हे ससून रुग्णालयातील आहेत. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या कारभारावर टीका होऊ लागली आहे.

पुणे - उपचारासाठी उशिरा दाखल होणे आणि अत्यवस्थ रुग्ण यामुळे ससून रुग्णालयातील कोरोनाबाधीत रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन ससून रुग्णालयात मृत्यू झाल्यांपैकी ९९ टक्के रुग्णांनी परदेश प्रवास केला नसल्याचे समोर आले आहे. तर ८४ टक्के रुग्णांना कोणापासून विषाणूचा संसर्ग झाला याची निश्‍चिती होऊ शकली नाही. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पुणे शहरात मरण पावलेल्या रुग्णांचा आकडा ३७ वर गेला आहे. त्यापैकी २७ रुग्ण हे ससून रुग्णालयात दगावले आहेत. त्यातील मृत पावलेल्या २५ रुग्णांचे ससून रुग्णालयाकडून करण्यात आलेल्या विश्‍लेषणातून ही माहिती समोर आली आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

डॉ. नायडू रूग्णालयाबरोबरच ससून आणि अन्य काही रुग्णालयांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक मरण पावलेले रुग्ण हे ससून रुग्णालयातील आहेत. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या कारभारावर टीका होऊ लागली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ससून रुग्णालयाने मृत पावलेल्या रुग्णांचे विश्‍लेषण केल्यानंतर अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. 

२४ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत 
मृत पावलेल्या २५ पैकी केवळ एकाच रुग्णांचा परदेश प्रवासाचा इतिहास आढळून आला आहे. आतापर्यंत ससून रग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ७६ पैकी ६४ रूग्णांना कोणापासून संसर्ग झाला, याची निश्‍चित माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. ससून रुग्णालयात मृत्यू झालेल्या ३९ टक्के रुग्णांना दम लागला होता. तर, ३६ टक्के रुग्णांचे अंग तापाने फणफणले होते. त्यापाठोपाठ ३२ टक्के रुग्णांना खोकला असल्याचे विश्‍लेषणातून समोर आले आहे. मात्र, २४ टक्के रुग्णांना कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसली नसल्याचे यात अधोरेखित करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most patients died in the Sassoon hospital filed late