Coronavirus : लढू अन्‌ जिंकूही...

worker
worker

लॉकडाउनमुळे सारेच ठप्प झाले. कारखान्यांतील चाके थांबली. थरावर थर करीत इमल्यांना आकार देणाऱ्या विटा ढिगाऱ्यावरच निपचित पडल्या. पर्यायाने मजूर, कामगारांनी गावाची वाट धरली. काही जण इथेच अडकून पडले. हे कामगार पुन्हा गावाहून परततील तेव्हाच सर्व उद्योग-व्यवसाय सुरू होऊ शकणार आहे. आता प्रश्‍न आहे तो पुन्हा सावरण्याचा. यामुळे औद्योगिक, बांधकाम क्षेत्रासह सारेच चिंतेत आहेत. ‘निखळली शृंखला जरी...घेऊ उभारी तरी’ अशी खूणगाठ बांधून लढा उभारावा लागणार आहे.

पुणे - लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणावर कामगार गावाकडे परतले असले तरी, आजही बहुसंख्य कामगार शहरातच आहेत, ते केवळ आज ना उद्या हातांना काम मिळेल या आशेवर. मात्र, तरीही त्यांना हमी हवी आहे ती आरोग्याची. छोटे उद्योग, व्यावसायिकांसह कंपन्यांनी त्यांना ‘इम्युनिटी बूस्टर’ दिल्यास ते कामावर परत येतील, अशी आशा तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ही आशा फळास आल्यास उद्योजकांना पडलेली कामगारांची चिंता आणि कामगारांना पडलेला उदरनिर्वाहाचा प्रश्‍न चुटकीसरशी सुटणार आहे.

कामगारांमध्ये असंघटित कामगारांची संख्या मोठी आहे. त्यांच्या जीवावरच सर्व क्षेत्रांची चक्रे फिरतात. तथापि, कोरोनामुळे देशात सुरू केलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रे बंद करावी लागली. परिणामी, कामगारांच्या रोजंदारीवर गदा आली. त्यामुळे त्यांच्यापुढे रोजीरोटीचा प्रश्‍न उभा ठाकला. अशा परिस्थितीत कुटुंब जगवायचं कसं हा प्रश्‍न त्यांना भेडसावू लागला. यातून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी गावाची वाट धरली. बहुतांशजण पुण्यातच अडकून पडले. एकीकडे कामगार गावी निघून गेल्याने उद्योजक, व्यावसायिक चिंतेत पडले आहेत. तर दुसरीकडे अडकून पडलेल्या कामगारांना काम हवे आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांना कामाशिवाय पर्यायच नाही. असे असले तरी, आपण जेथे काम करणार आहोत, तेथे आपल्या सुरक्षिततेची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा त्यांच्या गोटातून घेतलेल्या कानोशातून व्यक्त होत आहे. 

दरम्यान, काही कंपन्यांनी कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. कंपन्यांकडून कामगारांना प्रतिकारशक्ती वाढणारी औषधे (इम्युनिटी बूस्टर) देण्यात येत आहेत. कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, मास्क आदी सुविधा कामगारांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे कामगार आणि कंपन्यांतील भावनिक नातंही सुदृढ होत असल्याचे चित्र आहे. हे चित्र असेच राहिले तर, लॉकडाउनमुळे विस्कटलेली गाडी रुळावर येण्यास वेळ लागणार नाही, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com