पुणेकरांनो कोरोनामुळे तुमच्या जिवाला धोका आहे, घराबाहेर पडू नका...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

पोलिसांनी  "ऑपरेशन ऑलआउट' ही मोहीम राबविण्यास सुरवात केली. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना भररस्त्यात योगा व उठाबशा काढण्याच्या शिक्षेपासून ते थेट त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. 

पुणे - बाबांनो कोरोनामुळे तुमच्या जिवाला धोका आहे, घराबाहेर पडू नका असे आवाहन पोलिस नागरिकांना रोज करीत आहेत. तरीही नागरिक मात्र सुधारत नाहीत. विशेषतः सुशिक्षित व्यक्तीच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर येत असल्याने त्यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी "ऑपरेशन ऑलआउट' ही मोहीम राबविण्यास सुरवात केली. त्यानुसार मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना भररस्त्यात योगा व उठाबशा काढण्याच्या शिक्षेपासून ते थेट त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना चांगलीच अद्दल घडविण्यात आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील कोरोना संसर्ग त्यामुळे होणाऱ्या मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून संचारबंदी अधिक कडक झाली आहे. तरीही त्यास न जुमानता पोलिस पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी दररोज हजारो लोक मॉर्निंग वॉकसाठी, किरकोळ कारणांसाठी घराबाहेर पडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध "ऑपरेशन ऑल आउट' राबविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. गुरुवारी सकाळपासून पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, शिरीष सरदेशपांडे, पौर्णिमा गायकवाड, पंकज देशमुख, सुहास बावचे यांच्यासह सर्व सहाय्यक पोलिस आयुक्त, 100 वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे 100 कर्मचारी, पोलिस ठाण्याचे 600 ते 800 कर्मचारी असा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला. त्यानंतर त्यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरवात झाली. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

76 जणांविरुद्ध गुन्हा- 
पोलिसांनी मॉर्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांना अडवून त्यांना योगा करण्यास भाग पाडले. तर काही ठिकाणी उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. पोलिसांनी 100 पेक्षा जास्त लोकांवर कारवाई केली. त्यामध्ये 76 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. ही कारवाई सकाळच्या सहा तासात करण्यात आली. 

काही व्यक्तीमुळे पुण्याच्या लॉकडाउनला बट्टा लागत आहे. त्यांच्यामुळे नियम पाळणाऱ्या लोकांचा जीव धोक्‍यात आला आहे. अशा हे बेजबाबदार लोकांविरुद्ध "ऑपरेशन ऑल आउट" ही मोहीम सुरू केली आहे. काही ठिकाणी अभिनव पद्धतीने नागरिकांना ताकीद देण्यात आली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शहरात सर्व प्रकारच्या मोहिमा राबवून बेशिस्त प्रवृत्तीला ठिकाणावर आणले जाईल. 
- डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police take action on 76 people for Morning Walk