निम्मा पगार द्या, पण कंपन्या सुरू करा; बेरोजगारीची टांगती तलवार कायम 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

कामगारांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. घराघरांत कलह होण्यास सुरुवात झाली आहे. लोक रस्त्यावर येतील. घरच उपाशी असेल, तर ते तरी काय करतील?

पिंपरी - सांगलीचा उमेश काळे आणि औरंगाबादचा उस्मान पठाण पिंपरी-चिंचवडमधील दोन कंपन्यांत काम करतात. गेल्या आठ वर्षांपासून ते येथे कुटुंबासह राहतात. पगार तसा बऱ्यापैकी आहे. दोघांची गावे दुष्काळी. भोसरी एमआयडीसी परिसरात त्यांची भेट झाली. लॉकडाउन असा विषय आला आणि त्यांचा बांध फुटायचा तेवढा बाकी राहिला. "आमच्या नोकऱ्या गेल्यातच जमा आहेत,' अशीच भावना त्यांच्या मनात आहे. ही दोन केवळ उदाहरणे आहेत. पण प्रत्येक कामगाराच्या घरात हीच भावना आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउनबाबतच्या परिस्थितीबाबत तीस कामगारांशी बोलणे झाले. त्यांचा सूरही असाच होता. कामगारांना नोकरीवरून काढू नका, पगार कपात करू नका असे सरकार सांगत असले तरी लघुउद्योग घटकातील कंपन्या, अथवा ठेकेदारांना ते शक्‍य होणार नाही. कामगारांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. घराघरांत कलह होण्यास सुरुवात झाली आहे. लोक रस्त्यावर येतील. घरच उपाशी असेल, तर ते तरी काय करतील? 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जिवाची काळजी आहेच ना? 
काही मोठ्या कंपन्या एक महिना, दोन महिना पगार देतील. इतर काहीजण माणुसकीच्या भावनेने मदत करतील; पण किती दिवस? मूळ प्रश्‍न असा आहे की, कंपन्या बंद ठेवणे खरेच गरजेचे होते का? मुळात कंपनी आणि काम जिथे चालते तो फ्लोअर हे गर्दीचे ठिकाण नाही. लॉकडाउनपूर्वीच कंपन्यांत कोरोनाविषयक सूचनांचे पालन केले जात होते. यात सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग केले जात होते. सध्या कामगार सुशिक्षित आहेत. प्रत्येकाला जिवाची काळजी आहेच ना? 

कंपन्यांमध्ये अकुशल कामगार अधिकाधिक उत्तर भारतातील आहे. हे प्रमाण पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक आहे. यातील काही भीतीपोटी गावी परतले आहेत. मात्र, जे जाऊ शकलेले नाहीत त्यांना थांबवून ठेवणे गरजेचे आहे. आता लॉकडाउन संपण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ते जर गेले, तर पुन्हा परत लवकर येणे अवघड आहे. स्वबळावर व अनुभवाच्या जोरावर कौशल्य प्राप्त केलेल्या आणि आर्थिक स्थिती थोडी बरी असलेल्या कामगारांचेही कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती होणार आहे. कारण तेही एक दोन महिने तग धरू शकतील. उत्तर भारतीय लोक तिकडे पडेल ते काम करू शकतात; पण या वर्गाचे काय? कायम नोकरी, बरा पगार म्हणून घरासाठी काढलेल्या कर्जाचे काय? मुलांच्या शिक्षणाचे काय? आता गावी जाऊन काम करायचे तरी काय? अशा असंख्य प्रश्‍न त्यांच्यासमोर आहेत. 

तडजोडीची तयारी 
कामगारांचे व्हॉटस्‌ऍप ग्रुप आहेत. त्यावर रात्रंदिवस सध्याची स्थिती शेअर केली जाते. त्यातून एकमेकाला धीर दिला जातो. पुन्हा एकत्र येऊ. पगाराविषयी तडजोड करू, मात्र, कंपनी सुरू व्हायला पाहिजे. लॉकडाउन वाढवला असला तरी उद्योग क्षेत्रावरील सर्व निर्बंध उठवावेत, असेच सार्वत्रिक म्हणणे आहे. 

आर्थिक चाके फिरायला हवीत 
कंपन्या सुरू व्हायला पाहिजे. यंत्रांची पर्यायाने राज्याची आर्थिक चाके फिरायला हवीत, असे उद्योगक्षेत्रातील प्रत्येकाला वाटते. विशेषतः मोठ्या उद्योगसमूहात प्रचंड सुरक्षितता पाळली जाते. त्यामुळे कोरोनासंदर्भात आणखी काही सूचना दिल्यास उद्योजक अधिक दक्षता घेऊन कंपनी सुरू करतील. पुन्हा एकदा कामगारांची आरोग्य तपासणी आणि कंपनी निर्जंतुकीकरण करावी. कामगारांच्या राहण्याची व्यवस्था कंपन्यांना होस्टेलमध्ये करता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: worker reaction give half salary but start companies