धक्कादायक! विदर्भातील हा जिल्हा पुन्हा रेडझोनकडे; एकाच कुटुंबातील 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

एकाच वेळेला सहा जण पॉझिटिव्ह आल्याची बुलडाणा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. जिथे एका व्यक्ती सोबत सात जण कोरोना बाधित आढळलेत.

खामगाव (जि.बुलडाणा) : येथून जवळच असलेल्या ग्राम जळका भडंग येथे पुण्याहून आलेला 25 वर्षीय तरुण कोरोना बाधित आढळला होता. त्याच्या कुटुंबाचे आणि संपर्कातील इतरांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यानंतर याबाबत आरोग्य विभागाकडून आज सकाळी माहिती मिळाली की, संपर्कातील सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरले आहे. 

यामध्ये आई-वडील, दोन लहान मुली, पुतण्या तसेच इतर मिळून एकूण सात जण पॉझिटिव्ह मिळून आल्याने खामगाव तालुक्यासह बुलडाणा जिल्ह्याची चिंता वाढली आहे. रिपोर्ट रात्री उशिरा 1.30 वाजता प्राप्त झालेत. एकाच वेळेला सहा जण पॉझिटिव्ह आल्याची बुलडाणा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. जिथे एका व्यक्ती सोबत सात जण कोरोना बाधित आढळलेत.

आवश्यक वाचा - कृषी विद्यापीठ करेल आता उद्योजकांची घडवणूक, सरकार देईल 25 लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य

हा 25 वर्षीय तरुण आणि कुटुंब मिळून आता जळका भडंग या छोट्याशा गावात एकूण कोरोना पॉझिटिव्ह संख्या आठवर पोहचली आहे. ग्राम जळका भडंग येथे कोरोना पॉझिटिव्ह संख्या आठवर गेल्याने आजूबाजूच्या परिसरात ग्रामस्थांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोग्य विभाग व पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, गावात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गाव पूर्णपणे सील करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना स्वच्छता बाळगण्याचे आवाहन करीत असून, सॅनिटायझर व मास्कचा नियमितपणे वापर करण्याबाबत नागरिकांनी दखल घेणे गरजेचे आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी आपापल्या घरात राहून सोशल डिस्टन्स पाळत स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ठाणेदार सचिन चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश खंडारे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 members of the same family from buldana district tested positive for corona