शेतकऱ्यांकडून पीककर्जासाठी स्टॅम्प पेपर मागणे पडेल महागात, बॅंकांना ताकीद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून १०० रुपयांच्या अथवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या स्टॅम्प पेपरवर हमी पत्र घेण्याची सक्ती करू नये. तसेच कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी,

अकोला  : लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून १०० रुपयांच्या अथवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या स्टॅम्प पेपरवर हमी पत्र घेण्याची सक्ती करू नये. तसेच कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व बॅंकांना दिले आहेत.

लॉकडाउन कालावधित निर्माण झालेल्या परिस्थिती संदर्भात नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांनी सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार मुद्रांक अधिनियम कलम १७ नुसार आवश्यक दस्तांचे शुल्क लॉकडाउन कालावधी संपल्यानंतर कामकाज सुरु झाल्यावर भरले तरी ते मुदतीत भरले असे मानले जाते. अशाही परिस्थितीत शुल्क भरणे शक्य नसल्यास कलम ४० प्रमाणे अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८९ नुसार गहाण वा कर्ज व्यवहारात ३० दिवसांचे आत व्यवहाराचे दस्त जमा करणे आवश्यक आहे.

तथापि ३० दिवसांची कालमर्यादा कार्यालय बंद कालावधीत संपुष्टात आली असल्यास लॉकडाउनइ कालावधी संपल्यानंतर म्हणजेच कार्यालय पुन्हा सुरू झाल्यावर दस्त जमा करता येतील. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांच्या या निर्देशानुसार सर्व बॅंकांनी पीक कर्जासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून १०० रुपयांच्या वा अधिक रकमेच्या हमीपत्राची सक्ती करु नये. सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत.

लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सकाळने वेधले होते लक्ष
खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने आदेश काढून बँकांना सूचना दिल्या आहेत. मात्र जिल्ह्यात शासन आदेशाविरुद्ध काम सुरू असून, पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडे स्टॅम्पची मागणी केली जात असल्याने त्यावर आमदार रणधीर सावरकर यांनी आक्षेप घेतल होता. याबाबत ‘सकाळ’ने लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लक्ष वेधत १४ मे रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश काढून सक्ती न करण्याची सूचना बँकांना केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Farmers have to ask for stamp paper for crop loans at exorbitant prices, banks have been warned