आनंदवार्ता : अकोल्यात आतापर्यंत शंभर रुग्ण झाले कोरोनामुक्त, तीन दिवसात 86 जणांना दिला डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

डिस्चार्ज देण्यात आलेल्या मध्ये 23 एप्रिल रोजी सात जण व 27 एप्रिल रोजी एका जणास, 30 एप्रिल रोजी तिघांना आणि 3 मे रोजी दोघांना, 6 मे रोजी एकास, 12 मे रोजी 60 जणांना, 14 रोजी 12 जणांना आणि 15 मे रोजी 28 जणांना असे 100 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

अकोला : अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत मागील तीन दिवसांपासून डिस्चार्ज देण्याची गतीही वेग धरत आहे. बारा मे ते 15 मे दरम्यान तब्बल 86 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत शंभर जणांनी अकोल्यात कोरोनाला हरविले आहे.

अकोला येथे सात एप्रिल रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता त्यानंतर 15 मेपर्यंत ही संख्या 208 जाऊन पोहोचली आहे यामध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाला असून या पंधरा जणांपैकी बहुतांश रुग्ण शेवटच्या स्टेपला रुग्णालयात पोहोचले असल्याने त्यांच्यावर उपचार करणे अवघड झाले मात्र असे जरी असले तरी आतापर्यंत तब्बल शंभर जणांना योग्य ते उपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आवश्यक वाचा - ट्रकमधून येत होती दुर्गंधी; नागरिकांनी थांबवून पाहणी केल्यास समोर आले धक्कादायक चित्र

डिस्चार्ज देण्यात आलेल्या मध्ये 23 एप्रिल रोजी सात जण व 27 एप्रिल रोजी एका जणास, 30 एप्रिल रोजी तिघांना आणि 3 मे रोजी दोघांना, 6 मे रोजी एकास, 12 मे रोजी 60 जणांना, 14 रोजी 12 जणांना आणि 15 मे रोजी 28 जणांना असे 100 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत 96 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा - वाह! याला म्हणतात वेळेचा सदुपयोग, तो पण चक्क शाळेत क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींकडून...वाचा

उपचारासाठी वेळ दवडू नका
आपल्याला कोरोना आजाराचे कुठलेही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ सर्वोपचार रुग्णालय गाठून उपचार घ्यावा असे आव्हान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडून करण्यात आले आहे तपासणीसाठी कोणतीही भीती बाळगू नये उशीर झाल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.

कोरोना बाधितांची आता एकच चाचणी
कोरोनाविषयी केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सुचनेनुसार, कोरानाच्या संदिग्ध रुग्णाच्या पहिल्या चाचणीनंतर तो पॉझिटिव्ह आल्यास त्यावर दहा दिवस उपचार केले जाणार आहेत. यानंतर त्याची पुन्हा चाचणी केली जाणार नाही. दरम्यान मध्यम लक्षणं असलेले रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना दहाव्या दिवशीच चाचणीशिवाय सुट्टी दिली जाणार आहे. परंतु, सुट्टी देत असताना रुग्णाला सलग तीन दिवस ताप किंवा आॅक्सिजनची गरज भासू नये, अशी अटही ठेवण्यात आली आहे. रुग्णाला सुट्टी दिल्यानंतर आता 14 दिवसांऐवजी केवळ सात दिवसांसाठीच त्यांना होम क्वारंटीन राहावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Akola, 100 people were corona free, 86 people were discharged in three days