महाविकास आघाडीचे २२ सदस्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार एक महिन्याचा प्रवास भत्ता

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी हातभार म्हणून आमदार व खासदार एक महिन्याचा पगार देणार असून, आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

 

अकोला : कोरोना विरोधातील लढाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या १३, कॉंग्रेसच्या चार, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन, एक अपक्ष सदस्य व शिवसेनेच्या पातुर पंचायत समितीच्या सभापतींनी त्यांचे एक महिन्याचे मानधन (प्रवास भत्ता) मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे. यासंदर्भात संबंधित पक्षांच्या गटनेत्यांनी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांना लेखी निवेदन दिले आहे.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी हातभार म्हणून आमदार व खासदार एक महिन्याचा पगार देणार असून, आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत शिवसेनेचे १३ जिल्हा परिषद सदस्य, कॉंग्रेसचे चार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन, एक अपक्ष सदस्य व शिवसेनेच्या पातुर पंचायत समितीच्या सभापती त्यांचे एक महिन्याचे मानधन (प्रवास भत्ता) मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार आहेत. शिवसेनेचे गटनेता गोपाल दातकर, कॉंग्रेसचे गटनेता सुनिल धाबेकर, राष्ट्रवादीच्या गटनेता सुमन गावंडे यांनी यासंबंधीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देवून त्यांच्या पक्षांच्या सदस्यांचे मानधन (प्रवास भत्ता) मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याची विनंती केली आहे.

या सदस्यांचे मानधन होणार जमा

  •  शिवसेनेचे गटनेता गोपाल दातकर, अप्पू तिडके, गोपाल भटकर, प्रशांत अढाऊ, गणेश बोबडे, संजय अढाऊ, संदीप सरदार, गायत्री कांबे, सुनिता गोरे, वर्षा वझीरे, लता पवार, गीता मोरे, अनुसया राऊत, लक्ष्मी डाखोरे (सभापती पंचायत समिती पातुर) व अपक्ष सदस्य गजानन पुंडकर यांचा प्रवास भत्ता मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा होईल.
  • राष्ट्रवादीच्या गटनेत्या सुमन गावंडे, रंजना विल्हेकर, वेणू डाबेराव यांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा होईल.
  • कॉंग्रेसचे गटनेता सुनिल धाबेकर, अर्चना राऊत, गजानन डाफे, नारायण चिंचोळकर यांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा होईल.

५३ पैकी २२ सदस्यांची तत्परता
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ५३ पैकी सर्वाधिक २५ जागा भारिप-बमंसला मिळाल्या. त्यासोबत महाविकास आघाडीतील शिवसेनेला १३, कॉंग्रेस ४ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला ३ जागा मिळाल्या. भाजपला ७ जागा मिळाल्या आहेत. या सदस्यापैकी अद्यापपर्यंत केवळ महाविकास आघाडीच्या २२ सदस्यांनीच कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात तत्परता दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या पुढाकारचे सर्वत्र कौतूक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola 22 members of mahavikas aghadi will provide  will provide one month travel allowance