कोरोनाला टक्कर देण्यासाठी 740 फायटर्स, ग्रामीण भागात स्वच्छताग्रही म्हणून करणार काम

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 6 May 2020

शहरात वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूने आता गाव- खेड्यातही एन्ट्री केली आहे. त्यामुळे ग्रामीणमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी ग्रामीण भागातील ७४० स्वच्छताग्रही सरसावले आहेत.

 

अकोला : शहरात वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूने आता गाव- खेड्यातही एन्ट्री केली आहे. त्यामुळे ग्रामीणमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी ग्रामीण भागातील ७४० स्वच्छताग्रही सरसावले आहेत.

कोरोना विषाणूपासून पसरत असलेल्या कोविड १९ या आजाराबाबत नागरिकांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने तसेच ग्रामस्तरावर व्यापक जनजागृतीसाठी जिह्यातील ७४० स्वच्छताग्रहींना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित करण्यात आले आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन, व युनिसेफ यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामपातळीवर स्वच्छताग्रही म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याबाबत सुचना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे ग्राम पंचायत मध्येच राहून व सोशल डिस्टेन्सींगचे पालन करून जिह्यातील ७४० स्वच्छताग्रही प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा फायदा ग्रामस्तरावर होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांचे मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजू फडके यांचे नेतृत्वात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या यांचे वतीने २९ व ३० एप्रिलला स्वच्छताग्रहींना सदर प्रशिक्षण देण्यात आले.

सात सत्रात पार पडलेल्या प्रशिक्षणात जिल्हा कक्षाचे वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजू फडके यांनी प्रशिक्षणात सहभागी झालेल्यांना कोविड १९ बाबत काम करण्याचे आवाहन केले. या प्रशिक्षणाकरिता साधन व्यक्ती म्हणून दहीहंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. रुपेश कळसकर, आरोग्य पर्यवेक्षक गणेश बोरकर, माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ अर्चना डोंगरे, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश डहाके, क्षमता बांधणी तज्ञ व मनुष्यबळ विकास सल्लागार प्रवीण पाचपोर, एमआय सल्लागार राहुल गोडले सहभागी झाले होते.

कोरोनाची दिली माहिती
स्वच्छताग्रहींना देण्यात आलेल्या प्रशिक्षणात कोविड १९ बाबत उपाययोजना व संसर्ग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आणि सध्या स्थिती, शासन आदेश आणि उपक्रम, आंतरव्यक्ती संवादाच्या माध्यमातून जनजागृती करणे, शारीरिक अंतर राखण्यासाठी उपायायोजना, काल्पनीक माहिती आणि गैरसमज, अधिक जोखमीचे गट आणि संभाव्य रूग्ण ओळखणे, मानसिक काळजी, मानहानी व भेदभाव, कोविड १९ आजाराबाबत समज- गैरसमज, कार्यरत यंत्रणेला मदत करणे, आजाराबाबत सामान्य दिसून येणारे लक्षणे, समुदायामध्ये सुरक्षित सवयी, श्वसनसंस्थेची स्वच्छता, शारीरिक अंतर राखणे, अधिक जोखमीचे गट, आजाराचे प्रसार होण्याचे मार्ग, हातांची स्वच्छता, मास्कचे प्रकार व उपयोग, मास्कची हाताळणी, फ्रंटलाईन वॉरीयरसाठी खबरदारीच्या आणि सुरक्षितेच्या उपाययोजना तसेच या आजाराबाबत केस स्टडी बाबत माहिती देण्यात आली.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दिली माहिती
कुटूंब आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत पिण्याचे पाणी, पाणी साठवण, हाताळणी आणि स्त्रोत स्वच्छता, शौचालयाचा वापर आणि स्वच्छता, मैल गाठ व्यवस्थापन, कोविड संभाव्य आणि बाधित व्यक्ती संबंधी काळजी या सत्रात उपाययोजना आणि प्रतिबंध व सहयोगी वातावरणाची निर्मिती, घरच्या घरी विलगीकरण व संभाव्य बाधित व्यक्तींचे सुरक्षित वास्तव्य, संभाव्य संक्रमित व्यक्तींच्या घरातील कुटूंबियांना घ्यावयाची खबरदारी, कुटूंबस्तरावरील विलगीकरण केलेल्या घरातील टाकाऊ पदार्थ्यांची योग्य विल्हेवाट, कुटूंबियांची सुरक्षितता, प्रोत्साहन आणि स्वच्छता विषयक अपेक्षित वर्तन, मानहानी व भेदभाव, कोविड १९ बाबत गैरसमज आणि संवाद उपक्रम आणि इतर यंत्रणा समन्वय, ग्रसमस्तरावर कोविड बाबत घ्यावयाची काळजी व जनजागृती बाबत तज्ज्ञ साधन व्यक्ती यांनी मार्गदर्शन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola 740 corona fighters working in rural area marathi news