हॉटेल व ढाब्यांवर प्रवाशांची झुंबड ; सामुदायिक संसर्गाचा धोका, राष्ट्रीय महामार्गावरुन मजुरांचा जीवघेणा प्रवास सुरूच

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

मुंबई, पुणे व परराज्यातून येणाऱ्या मजुरांची संख्या कमी होताना दिसत नसून महामार्गावरुन जाणाऱ्या प्रत्येक वाहनामध्ये माणसे जनावरांसारखी भरून आपल्या गावी जाण्यासाठी निघाली आहेत.

 

बाळापूर (जि.अकोला) : मुंबई, पुणे व परराज्यातून येणाऱ्या मजुरांची संख्या कमी होताना दिसत नसून महामार्गावरुन जाणाऱ्या प्रत्येक वाहनामध्ये माणसे जनावरांसारखी भरून आपल्या गावी जाण्यासाठी निघाली आहेत.

अत्यंत धोकादायक असा हा प्रवास करीत असताना ट्रक, कंटेनर, बोलोरो, टेम्पो अशा वाहनांमध्ये दाटीवाटीने गर्दी करून ही माणसे आपल्या गावी जाण्यासाठी निघाली आहेत. दरम्यान या प्रवाशांचे लोंढेच्या लोंढे महामार्गावरील ढाबे व हॉटेल्सवर दिसत आहेत. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशभर लागू केलेल्या लॉकडाऊननंतर ३१ मे पर्यंत त्यामध्ये वाढ करण्यात आली. त्यातच मुंबई, ठाणे परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक बनली असल्याने स्थलांतरीत मजूर कामगार यांचा धीर खचायला लागला आहे. स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्या साठी प्रयत्न सुरू केले असतानाही कामगार मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जाण्यास निघाले आहेत.

धुळे - कोलकाता महामार्गावर असंख्य ट्रक, कंटेनर, बोलेरो टेम्पो, रिक्षा तर कोणी सायकलवरून आपल्या गावी जायला निघाले आहेत. पायी चालणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी दररोज हजारोंच्या संख्येने या मार्गावरून माणसांची वाहतूक होत आहे.

ढाबे व हॉटेल्सवरील गर्दी मुळे संसर्गाचा धोका
मुंबई, पुणे व परराज्यातून येणारे माणसांचे ट्रक प्रवासा दरम्यान महामार्गावरील ढाबे व हॉटेल्सवर थांबत आहेत. त्यामुळे बाळापूर ते अकोला दरम्यानच्या हॉटेल्सवर माणसांची होणारी गर्दी प्रशासनाची डोकेदुखी वाढविणारी ठरू लागली आहे. हि माणसांची होणारी गर्दी “करोना’चा धोका वाढविणारी ठरू लागली आहे. महामार्गावर ठिक - ठिकाणी फळं विक्रेत्यांची दुकाने थाटली आहेत. या दुकानांवर दररोज गर्दी वाढत आहे. कानांपुढील गर्दी फिजिकल डिस्टन्स पाळत नसल्याने सर्वत्रच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ढाबे, हॉटेल्स समोरील गर्दीमुळे सामुदायिक संसर्ग वाढण्याचा मोठा धोका आहे. पायी प्रवास करणाऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. लटकून जर कोणी प्रवास करत असतील तर असे निदर्शनास आल्यास त्या ट्रक चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबई, पुणे किंवा परराज्यातून अकोला जिल्ह्यात परतणाऱ्या नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
- प्रा.संजय खडसे, उपजिल्हाधिकारी, अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola balapur Crowds of passengers at hotels and dhabas; Danger of community infection, life-threatening journey of workers on national highways continues