कच्च्या तेलाचे दर घटले, बघा कुणाला मिळणार लाभ? 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घटल्यानंतरही त्याचा लाभ मिळणार नाही. दर वाढल्यानंतर पेट्रोल, डिझेलचे दर ग्राहकांसाठी तातडीने वाढवले जातात. मात्र आता दर कमी झाल्यावर ग्राहकांना दर कमी करून देणे आवश्यक असताना त्यांच्या हक्कावर केंद्र शासनाने घाला घातला आहे.

 

अकोला ः केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घटल्यानंतरही त्याचा लाभ मिळणार नाही. दर वाढल्यानंतर पेट्रोल, डिझेलचे दर ग्राहकांसाठी तातडीने वाढवले जातात. मात्र आता दर कमी झाल्यावर ग्राहकांना दर कमी करून देणे आवश्यक असताना त्यांच्या हक्कावर केंद्र शासनाने घाला घातला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने देशभर लॉकडाउन केले आहे. त्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवर झाला आहे. केंद्र व राज्याच्या महसुलात मोठी घट झाली आहे. ही घट भरून काढण्यासाठी इंधनावर उत्पादन कर वाढविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्याचा ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही. हा वाढिव उत्पादन कर पेट्रोलियम कंपनीकडूनच सरकार वसूल करणार असल्याने अकोल्यातील ग्राहकांना सध्या आहे, त्याच दरात पेट्रोल, डिझेल उपलब्ध होणार आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर प्रचंड घटले आहेत. त्याचा लाभ ग्राहकांना देण्याची ही वेळ होती. तो त्यांना मिळाला नाही. उलट ग्राहकांना त्यांच्या हक्काचे दर मिळू शकले नाही.

एका हाताने घेतले, दुसऱ्या हाताने वाटले
इंधन उत्पादनाचा कर वाढवून केंद्र शासनाने पेट्रोलियम कंपन्यांवर कराचा बोजा टाकला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर घटल्यानंतर होणारा लाभ कंपन्यांना होणार नाही. परिणामी त्यांना पेट्रोल, डिझेलचे दर कमी करता आले नाही. हा प्रकार म्हणजे एका हाताने घेतले व दुसऱ्या हाताने वाटले असला असल्याची प्रतिक्रिया पेट्रोल पंप संचालकांमध्ये उमटत आहे. ग्राहकांना लाभ देण्याची हीच संधी होती, ती केंद्र शासनाच्या निर्णयामुळे कंपन्यांनी गमावली असल्याचेही पेट्रोलपंच संचालकांचे म्हणणे आहे.

केंद्र शासनाने इंधनावर वाढविलेला कर हा पेट्रोलियम कंपन्यांकडूनच वसूल केला जाईल. त्याचा ग्राहकांवर बोजा पडणार नाही. मात्र कच्च्या तेलाचे दर बघता ग्राहकांना त्याचा लाभ द्यायला हवा होता. तो आता मिळू शकणार नाही.
-राहुल राठी, जिल्हाध्यक्ष, पेट्रोल-डिझेल असोशिएशन, अकोला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola consumers do not benefit from lower crude oil prices