याला म्हणतात कन्टेंन्मेंट झोन! समोर बंद, मागे.....

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 26 May 2020

एकीकडे अकोला शहरात कोरोना बाधिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विषाणू संसर्ग नियंत्रणाबाहेर जात असताना महानगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ परिसरातील मुख्य रस्त्याकडे येणारे सामोरेच रस्ते बंद केले जात आहे. परिसरातील मागच्या बाजूने रस्ते उघडेच राहत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक सर्सास बाहेर फिरताना दिसत आहे.

अकोला  : एकीकडे अकोला शहरात कोरोना बाधिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विषाणू संसर्ग नियंत्रणाबाहेर जात असताना महानगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ परिसरातील मुख्य रस्त्याकडे येणारे सामोरेच रस्ते बंद केले जात आहे. परिसरातील मागच्या बाजूने रस्ते उघडेच राहत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक सर्सास बाहेर फिरताना दिसत आहे.

कोरोना विषाणूच्या सामूहिक संसर्गाच्या उंबरठ्यावर अकोला येऊन पोहोचला आहे. रुग्ण संख्या 400 च्या पार गेली आहे. अशात प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने विषाणूचा संसर्ग संपूर्ण शहराला कवेत घेतो आहे. असे असतानाही कंटेन्मेटं झोनबाबत मनपा प्रशासनाकडून होत असलेला निष्काळजीपणा रुग्ण संख्या वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. कंटेन्मेंट झोनची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. नावापुरते प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

या परिसरातील नागरिक बाहेर पडू नये म्हणून परिसर काटेकोरपणे सिल करण्याची गरज आहे. मात्र नावापुरते सामोरचे रस्ते बंद केले जात आहे. परिसरातील इतर भाग उघडा राहत असल्याने नागरिक त्यातून त्यांची वाहने घेवून बिनधास्तपणे शहरात फिरत आहेत. याचे ताचे उदाहरण म्हणजे जठारपेठे रेल्वे क्वॉटरमध्ये कोरोना संसर्ग झालेले दोन रुग्ण आढल्यानंतर हा परिसर दिवेकर आखाड्याकडून सिल केला. मात्र रेल्वे लाईनच्या भागाने बिर्ला कॉलनीकडे येणारे रस्ते उघडे आहेत.

त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या घराजवळील नागरिकही मुक्तपणे फिरताना दिसत आहे. हीच परिस्थिती शहरातील सर्वच कंटेन्मेंट झोनची आहे. सर्वाधिक कोरोना प्रभावित बैदपुरा, फिरदौस कॉलनी आदी भागातील नागरिक प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पडत आहे. हे परिसरही नावालाच सिल करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.

एक तर पूर्ण, नाही तर पूर्ण सुरू
प्रतिबंधित क्षेत्राबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. एक तर प्रतिबंधित क्षेत्रात काडेकोर अंमलबजावणी करा किंवा पूर्ण पणे सुरू ठेवा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

नागरिकांनीही संयम पाळणे गरजेचे
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना प्रशासनातर्फे घरपोच सुविधा देण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडण्याचे कारणच नाही. आरोग्य सुविधाही या क्षेत्रातील नागरिकांना दिल्या जात आहे. त्यामुळे प्रतबिंधित क्षेत्रातील नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. संयम पाळा व कोरोनावर मात करा, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून केले जात आहे.

पोलिस घेत आहे बघ्याची भूमिका
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक बाहेर फिरत असताना पोलिस बघ्याची भूमिक घेत असल्याचे चित्र आहे. काहीही थातुरमातुर कारणे देवून नागरिक बाहेर पडतात. त्यांना पोलिस कुठेही अडविताना दिसत नाही. त्यामुळे अकोला शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

बाहेरून आलेल्यांची थेट शहरात आल्यावरच विचारणा
अकोला शहर हे आधीच रेड झोनमध्ये आहे. त्यात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना अकोल्यात प्रवेश करताना जिल्ह्याच्या सीमेवर किंवा शहराच्या सीमेवरही कुठेच विचारणा होताना दिसत नाही. थेट शहरात घरी पोहोचल्यानंतर ई-पास असलेल्या नागरिकांपर्यंतच मनपाची यंत्रणा पोहोचत आहे. त्यामुळे प्रशासनातील समन्वय नसल्याचे उघड दिसून येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola contentment zone! Front closed, back