महानगरपालिका हद्दीत धोका : आणखी दोन कन्टेन्मेंट झोन वाढले, एकूण 26 परिसर सिल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

महानगरपालिका क्षेत्र कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट ठरतो आहे. आतापर्यंत शहरात १५० च्यावर कोरोना बाधित रुग्ण आढलले आहेत.

 

अकोला  ः महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. सामूहिक संसर्गाच्या उंबरठ्यावर अकोला शहर येऊन पोहोचले आहे. सोमवारी आणखी दोन परिसरात रुग्ण आढळल्याने आता शहरात एकूण २६ परिसर सिल करण्यात आले आहे.

अकोला महानगरपालिका क्षेत्र कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट ठरतो आहे. आतापर्यंत शहरात १५० च्यावर कोरोना बाधित रुग्ण आढलले आहेत. सुरुवातीला बैदपुरा आणि अकोटफैलपुरता मर्यादित असलेला कोराना विषाणूचा संसर्ग आता शहराच्या ७० टक्के भूभागात पसरला आहे. काही मोजके परिसर सोडले तर संपूर्ण शहराला कोरोना विषाणूने कवेत घेतले आहे. यापूर्वी २४ परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आले होते. त्यात आता मोठी उमरी आणि जुने शहरातील किल्ला चौकाचाही समावेश झाला आहे. काही मोठे परिसर अजूनही संसर्गापासून दूर आहेत. मात्र बाहेर जिल्ह्यातून येणारे विद्यार्थी, कामगार व नागरिकांची संख्या बघता कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका आणखी वाढतो आहे.

...तर सामूहिक संसर्ग
कोरोना विषाणूने ७० टक्के शहराचा भाग व्यापला आहे. काही मोजके परिसर सोडले तर संपूर्ण शहरच हॉटस्पॉट झाले आहे. त्यानंतरही नागरिकांकडून हवी ती काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. वस्तू खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांसोबतच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शहरात संचारबंदी आहे की नाही, असा प्रश्न पडतो. ही परिस्थिती कायम राहिल्यास अकोला शहरात कोरोना विषाणू कोविड-१९ च्या सामूहिक संसर्गाला सुरुवात होण्यीची शक्यता नाकारता येत नाही.

संपूर्ण कडकडीत बंदच पर्याय
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे बंद न केल्यास रस्त्यावर होणारी गर्दी आणि वातावरणातील बदल यामुळे येणारा काळ अकोला शहरासाठी धोक्याचा इशारा देत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावर उपाय म्हणून संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवणे हाच उपाय पर्याय शिल्लक आहे.

राजकीय पक्षांनी घ्यावा पुढाकार
शहरातील विषाणू संसर्गाचा धोका वाढत असल्याने रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी संपूर्ण शहरात कडकडीत जनता कर्फ्यू पाळला जाईल, यासाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

घरात थांबा, सुरक्षित रहा
अकोला शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचलो आहे. यापुढे निट काळजी घेतली नाही तर विषाणू संसर्गाचा विस्फोट होऊन संपूर्ण शहरच कन्टेन्मेंट झोन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतः शिस्त पाळून विषाणू संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी घरात थांबा, सुरक्षित रहा याचे काटेकोर पालन नागरिकांनी केले पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडू नका. लक्षणे जाणवत असल्यास तपसाणी करून घ्या, संशयित आढळल्यास माहिती द्या, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola danger within the municipal limits: Two more containment zones increased, a total of 26 premises sealed