जन-धन खात्यातून मिळणार पाचशे रुपये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

भारत सरकारच्या आदेशानुसार महिलांच्या जन-धन बचत खात्यात गुरुवारपासून (ता. २) प्रत्येकी ५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सदर सानुग्रह अनदान एप्रिल, मे व जून महिन्यात जमा होणार आहे. जिल्ह्यातील महिलांच्या जन-धन बचत खात्यात एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले आहेत.

 

अकोला : भारत सरकारच्या आदेशानुसार महिलांच्या जन-धन बचत खात्यात गुरुवारपासून (ता. २) प्रत्येकी ५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सदर सानुग्रह अनदान एप्रिल, मे व जून महिन्यात जमा होणार आहे. जिल्ह्यातील महिलांच्या जन-धन बचत खात्यात एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील गरिबांवर उदरनिर्वाहाचे मोठे संकट आले आहे. या आपत्तीच्या काळात गरिबांनी उपाशी झोपू नये यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमार्फत महिला जनधन खातेधारकांना पुढील ३ महिने ५०० रुपये प्रती महिने याप्रमाणे देण्यात येतील अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली होती. त्याअंतर्गत महिलांच्या जन-धन बचत खात्यात गुरुवारपासून (ता. २) प्रत्येकी ५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

गर्दी न करता पैसे काढण्याचे आवाहन
समाजशील अंतर राखण्याचे भान ठेवत लाभार्थ्यांची गर्दी होऊ नये म्हणून बॅंकेतून पैसे काढण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्याअंतर्गत खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार पैसे काढण्याची तारीख देण्यात आली आहे.

असे आहे पैसे काढण्याचे वेळापत्रक
खाते क्रमांक शेवटचा अंक शून्य व एक असेल त्यांच्यासाठी पैसे काढण्याची तारीख शुक्रवार (ता. ३), शेवटचा अंक दोन व तीन असेल त्यांच्यासाठी शनिवार (ता. ४), शेवटचा अंक चार व पाच असेल त्यांच्यासाठी मंगळवार (ता. ७), शेवटचा अंक सहा व सात असेल त्यांच्यासाठी बुधवार (ता. ८), शेवटचा अंक आठ व नऊ असेल त्यांच्यासाठी गुरुवार (ता. ९) याशिवाय या सर्व लाभार्थ्यांना एटीएम तसेच बॅंक करस्पॉन्डन्ट मधून वा थेट शाखेतून पैसे मिळू शकतील, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तारेनिया यांनी दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Five hundred rupees from Jan Dhan Account