मोकळीक मिळाली, शिस्त पाळा, धोका टाळा; रस्त्यावरील गर्दीतून होऊ शकतो संसर्ग, यंत्रणांवर वाढता ताण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली नाही तर ही मोकळीकच नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

 

अकोला : कोरोना विषाणूचा धोका बघता लॉकडाउन करण्यात आले. अधिक कठोर उपाययोजना करताना ४ व ५ मे रोजी संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात आले. त्यानंतर ६ मे रोजी व्यवहार सुरू करण्यात आल्यानंतर झालेली गर्दी धोक्याची सूचना देवून गेली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीचा सम-विषम निर्णय मागे घेवून सकाळी ६ ते दुपारी ४ पर्यंतची वेळ वाढविण्यात आली. ही मोकळीक नागरिकांना सोयीसाठी दिली आहे. त्यामुळे यंत्रणांवरील ताण वाढणार आहे.

नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली नाही तर ही मोकळीकच नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

पुण्यातील झोपडपट्टीत साधले ते आपल्याला का जमणार नाही?
पुण्यातील एका झोपडपट्टीतील नागरिकांनी कोरोना विषाणूची बाधा टाळण्यासाठी शिस्त पाळण्याचा आदर्श घालून दिला आहे. तेथे दाट वस्ती आहे, दोन घरात एक फुटही अंतर नाही तरीही तेथे एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. पुण्यातील झोपडपट्टीतील नागरिकांनी जे साधले ते आपल्याला का नाही साधता येणार. त्यासाठी नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळत यंत्रणावरील ताण कमी करण्यास मदत करणे आवश्यक आहे.

शिस्त न पाळल्यास कम्युनिटी संसर्गाची भिती
प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी जीवनावश्यक वस्तू खरेदीची वेळ वाढवून दिली आहे. दिलेली मोकळीक ही नागरिकांच्या सुविधेसाठीच आहे. त्यामुळे नागरिकांनी शिस्त पाळून कुठेही गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जाणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. शिस्त न पाळल्यास व नियमांची ऐशीतैशी झाल्यास अकोल्यात सामूहिक संसर्गाचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही.

नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पुरेशा वेळ मिळावा. कुठेही गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंग पाळली जावी म्हणून वेळे वाढविण्यात आली. त्यामुळे यंत्रणांवरील ताण वाढणार आहे, याची जाणीव ठेवून नागरिकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. पुरेशे अंतर ठेवून राहणे, मास्क लावूनच घरा बाहेर पडणे, लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून घेणे, संशयित आढळल्यास त्याची माहिती यंत्रणांना देणे आदी बाबींचे कटाक्षाने नागरिकांनी पालन केल्यास अकोला शहर लवकरच कोरोना मुक्त करण्यास मदत होईल, अन्यथा -सामूहिक संसर्गाचा धोका वाढत राहील.
-संजय कापडणीस, आयुक्त, महानगरपालिका, अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola get free, follow discipline, avoid danger; Infection can be caused by road congestion