पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा सोडला वाऱ्यावर, जबाबदारीचे भानही विसरले

मनोज भिवगडे
Monday, 11 May 2020

सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला नेता अकोला जिल्ह्याचा पालकमंत्री झाला म्हणून जिल्ह्यातील जनतेने खूप अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र जिल्हा कोरोना विषाणूच्या संकटात असताना ते स्वजिल्ह्यात मग्न असल्याने अकोला जिल्हा पोरका झाला असल्याची भावना नागरिकांची झाली आहे.

 

अकोला  ः सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला नेता अकोला जिल्ह्याचा पालकमंत्री झाला म्हणून जिल्ह्यातील जनतेने खूप अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र जिल्हा कोरोना विषाणूच्या संकटात असताना ते स्वजिल्ह्यात मग्न असल्याने अकोला जिल्हा पोरका झाला असल्याची भावना नागरिकांची झाली आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्रीपद मिळाले. त्यांना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही सोपविण्यात आले. अकोला जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर मात्र त्याचा त्यांना सोयिस्कर विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या संकटात अकोला जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून स्वजिल्ह्मात मग्न असलेले पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडून अकोला जिल्ह्याला असलेल्या अपेक्षा अपूर्ण राहिल्यात.

अमरावती जिल्ह्यात काम करताना त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याने त्यांची लोकनायक अशी ओळख झाली होती. त्यातील कवडीचाही अनुभव अकोला जिल्ह्यातील नागरिकांना आला नाही. पालकत्व स्वीकारून जिल्ह्याला एखाद्या अनाथ मुलाप्रमाणे पालकमंत्र्यांनी या संकटाच्या काळात वाऱ्यावर सोडून दिल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे.

शासन प्रशासनातील दुवा कच्चा
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांच्याकडे सूत्र सोपविण्यात आली, तेव्हा त्यांनी शासन आणि प्रशासनातील एक मजबूत दुवा म्हणून काम करण्याचे आश्वासन जिल्ह्यातील नागरिकांना दिले होते. मात्र हा दुवाच कच्चा निघाला आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्याला शासनाच्या लेखी अनाथ घोषित करून टाका, अशी संतप्त मागणीही आता नागरिकांमधून होत आहे.

बैठत ते बैठक व झेंडावंदनापुरतेच पालकमंत्री
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर बच्चू कडून अकोला जिल्ह्यात केवळ आढावा बैठका घेण्यासाठीच आले आहेत. महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी झेंडावंदन करून पुन्हा गायब झालेले पालकमंत्री कोरोनाच्या संकटात जिल्ह्यातील उपाययोजनांसाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. या जिल्ह्यातील माजी पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी स्वतः सर्वोपचार रुग्णालयात जाऊन उपाययोजनांबाबत माहिती घेतली. मात्र जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्र्यांनी जिल्ह्याकडे साधे फिरकूनही बघू नये, ही या जिल्ह्याची शोकांतिका आहे.

सांत्वन करण्यासाठीच येणार का?
अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधिक रुग्णांचे दीड शतक पूर्ण झाले आहे. महानगरपालिका हद्दीतच नव्हे तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरले आहे. जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहे. पीक कर्जपासून ते कापूस विकण्यापर्यंतच्या अडचणी त्याच्या पुढे आहेत. सात दिवसांपासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पडली आहे. शेतकऱ्यांचा कुणी वाली नाही. जिल्ह्यातील उद्योगांचे प्रश्न गंभीर आहेत. शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्र्न गंभीर आहे. परप्रांतीय मजुरांची प्रवास करताना प्रशासनाकडूनच लुट सुरू आहे. कोरोना उपाययोजना प्रशासन त्यांच्या स्तरावर करीत आहे. मात्र शासनाकडून जे पाठबळ आवश्यक आहे, ते केवळ पालकमंत्रीच दुवा बनून करू शकतात. त्याचाही विसर पालकमंत्र्यांना पडला आहे. त्यामुळे आता केवळ सांत्वन करण्यासाठीच पालकमंत्री अकोल्यात येतील का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola guardian Minister Bachchu Kadu left the district and forgot his sense of responsibility