esakal | कामगारांना घेवून जबलपूर श्रमीक रेल्वे रवाना, आज भोपाळकरिता जाणार दुसरी गाडी, बंगाल, झारखंडसाठीही गाडीचे नियोजन
sakal

बोलून बातमी शोधा

train akola to jabalpur.

उत्तर प्रदेशातील कामगारांना घेवून पहिली श्रमीक रेल्वे अकोल्यातून रवाना झाल्यानंतर गुरुवारी (ता.७) सायंकाळी ८ वाजता अकोला रेल्वे स्थानकावरून जबलपूरकरिता दुसरी श्रमीक रेल्वे रवाना करण्यात आली. विशेष म्हणजे, या रेल्वेने प्रवास करणाऱ्या कामगारांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही.

कामगारांना घेवून जबलपूर श्रमीक रेल्वे रवाना, आज भोपाळकरिता जाणार दुसरी गाडी, बंगाल, झारखंडसाठीही गाडीचे नियोजन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : उत्तर प्रदेशातील कामगारांना घेवून पहिली श्रमीक रेल्वे अकोल्यातून रवाना झाल्यानंतर गुरुवारी (ता.७) सायंकाळी ८ वाजता अकोला रेल्वे स्थानकावरून जबलपूरकरिता दुसरी श्रमीक रेल्वे रवाना करण्यात आली. विशेष म्हणजे, या रेल्वेने प्रवास करणाऱ्या कामगारांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही.

अकोला रेल्वे स्थानकावरून शुक्रवारी (ता.८) मध्यप्रदेशकरिता दुसरी रेल्वे भोपाळकरिता जाणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अडकलेल्या कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी रेल्वे विशेष श्रमीक रेल्वेचे नियोजन केले आहे. त्यानुसार अकोला रेल्वे स्थानकावरून पश्चिम विदर्भातील कामगारांना घेवून जाणारी पहिली रेल्वे ४ मे रोजी उत्तरप्रदेशला रवाना झाली होती. त्या गाडीने ११९२ प्रवाशी पाठविण्यात आले होते. हे प्रवाशी उत्तर प्रदेशात पोहोचल्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने बसची व्यवस्था केली होती. त्यानंतर आता मध्यप्रेदशातील कामगारांसाठी दुसरी रेल्वे अकोला रेल्वे स्थानकावरून गुरुवारी रवाना करण्यात आली.

रात्री आठ वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला रेल्वे स्टेशन येथे हिरवा कंदिल दाखवून ही गाडी रवाना केली.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या समवेत पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, अमरावती येथील उपायुक्त प्रमोद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, तहसिलदार विजय लोखंडे, रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक अकोला मो.यस्मिन अन्सारी आदी उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाने मिळून या प्रवाशांच्या तिकिटाचा खर्च करण्याचे मान्य केल्यानंतर अकोला रेल्वे स्थानकावरून कामगारांसाठी विनामूल्य सोडण्यात आलेलीही ही पहिलीच रेल्वे आहे. मध्यप्रेदशकरिता दुसरी रेल्वे अकोला येथून शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता भोपाळकरिता पाठविण्यात येणार आहे.

१०८६ कामगार मध्यप्रेदशकडे रवाना
अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा या जिल्ह्यातील १०८६ स्थलांतरीत श्रमिक मजूर आज विशेष रेल्वेगाडीने अकोला येथून जबलपूरकडे रवाना झाले. त्यात अकोला जिल्ह्यातील १६०, अमरावती जिल्ह्यातील ३३६, वाशीम जिल्ह्यातील ४४, बुलडाणा जिल्ह्यातील २४३ व यवतमाळ येथील ३०३ प्रवासी होते.

पश्चिम बंगाल, झारखंडसाठीही पाठवणार रेल्वे
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील कामगारांसाठी अकोला येथून रेल्वे पाठविण्याबाबत भुसावळ रेल्वे विभागाला सूचना केली होती. त्यानुसार पश्चिम बंगाल व झारखंडच्या कामगारांची नोंदणी व त्यांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वेही लवकरच अकोला येथून नागपूर मार्गे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती आहे.