वडिलांच्या औषधासाठी तो चक्क 44 किलोमीटर पायी चालला!

मनोज भिवगडे 
Thursday, 16 April 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना आता बसू लागला आहे. दीर्घ आजाराच्या रुग्णांच्या उपचाराचे प्रश्‍न, ज्येष्ठ नागरिकांच्या औषधांचा प्रश्‍न गंभीर होताना दिसत आहे.

 

अकोला : श्रावण बाळाने अंध आई-वडिलांना तीर्थयात्रा करण्यासाठी पायदळ यात्रा केली होती. श्रावण बाळाच्या या गोष्टीने प्रेरीत एक तरूण अर्धांगवायू झालेल्या वडिलांच्या औषधांसाठी चक्क खामगाव ते अकोला हे ४४ किलोमीटरचे अंतर एका रात्रीतून पायी चालत पार करीत बुधवारी सकाळी औधष घेण्यासाठी अकोल्यात पोहोचला.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना आता बसू लागला आहे. दीर्घ आजाराच्या रुग्णांच्या उपचाराचे प्रश्‍न, ज्येष्ठ नागरिकांच्या औषधांचा प्रश्‍न गंभीर होताना दिसत आहे. लाकडाउनचा फटका बसलेला असाच एका अर्धांगवायू झालेल्या रुग्णाच्या मुलाने पितृऋण चुकविताना चक्क रात्रीतून प्रवास केला. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात असलेल्या चितोडा येथील तरूण सूरज गवई हा मंगळवारी रात्री गावातून पायी निघाला. रात्री राष्ट्रीय महामार्गावर एखादे वाहन मिळेल आणि अकोल्यापर्यंत पोहोचता येईल, असे त्याला वाटले. मात्र लॉकडाउनने त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. वडिलांचे औषध कोणत्याही परिस्थिती घेवून जायचेच असा निर्धार केलेल्या सूरजने त्याचा प्रवास पायीच सुरू केला. रात्रीतून ४४ किलोमीटर अंतर कापत सकाळी ६ वाजता अकोल्यात बाळापूर नाक्यावर पोहोचल. रस्त्यात न पिण्यासाठी पाणी मिळाले न खाण्यासाठी. दृढनिश्‍चिय केलेल्या सूरजने हा पायी प्रवास पूर्ण केला आणि अकोल्यात बाळापूर नाक्यावर त्याला पोलिसांनी अडवले. अखेर त्याने अकोला मेडिकलेच संचालक प्रदीप गुरुखुद्दे यांच्याशी संपर्क साधला आणि त्याच्या पुढच्या अडचणी दूर झाल्यात.

जेवन दिले, औधष दिले आणि गावी परत जाण्याची सुविधाही
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रदीप गुरुखुद्दे यांनी सूरजचा फोन आला तेव्हा तो कोण, कुठून आल्या याचा विचार न करता थेट त्याला मदत केली. डॉ. बिलाला यांच्याकडे सूरजच्या वडिलांचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे तो नियमितपणे अकोला मेडिकलवरून औषध घेवून जातो. औषध संपल्याने वडिलांना त्रास नको म्हणून त्यांने ५० किलोमीटरचे अंतर धैर्याने पार केले. येथे आल्यानंतर त्याला गुरुखुद्दे यांनी जेवन दिले, औषध दिले आणि सचिन अहिर या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून गावी जाण्यासाठी वाहनाची सुविधाही करून दिली.

सरकारने जे करायला होते ते भल्या माणसाने केले!
नागरिकांना संचारबंदीच्या काळात होणारा त्रास लक्षात घेता जे काम सरकाने करायला हवे होते, ते प्रदीप गुरुखुद्दे या भल्या माणसाने केल्याची भावनिक प्रतिक्रिया सूरजने व्यक्त केली. केलेल्या मदतीबद्दल त्याने अकोला मेडिलकच्या संचालकांचे व कर्मचाऱ्यांचे आभारही मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola to khamgaon he walked 2 kilometers to get his father's medicine