Lockdown : आजपासून हा फार्मूला लागू,; अत्यावश्यक सेवेसाठीच पडता येईल घरा बाहेर

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 6 May 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन दिवसाच्या संपूर्ण टाळेबंदीनंतर आता सम आणि विषम तारखेच्या नियमानुसार नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडता येईल. सदर आदेशाची आजपासून महानगर पालिका हद्दीमध्ये अंमलबजावणी करण्यात येईल.

 

अकोला  : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन दिवसाच्या संपूर्ण टाळेबंदीनंतर आता सम आणि विषम तारखेच्या नियमानुसार नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडता येईल. सदर आदेशाची आजपासून महानगर पालिका हद्दीमध्ये अंमलबजावणी करण्यात येईल.

महापालिका हद्दीमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महापालिका हद्दीत ४ व ५ मे रोजी संपूर्ण टाळेबंदी लागू केली. त्यामुळे नागरिकांना वैद्यकीय सेवा वगळता इतर कारणांसाठी घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती. दोन दिवसांची संपूर्ण टाळेबंदी संपुष्टात आल्यानंतर आता बुधवार (ता. ६) पासून महापालिका हद्दीत सम- विषम तारखेच्या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत नागरिकांना सम तारखांना पूर्वीच्या आदेशाप्रमाणे संचार बंदीच्या काळात सुट राहील तर विषम तारखांना संपूर्ण लॉकडाउनचे पालन करावे लागेल. या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीला सकाळी ६ ते १० व सायंकाळी ४ ते ६ यावेळेस सुट राहिल. त्यासोबतच वैद्यकीय सुविधा सम आणि विषम तारखांना सुरू राहतील, असे असले तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

‘सम’ तारखांना मर्यादित; ‘विषम’ला पूर्ण लॉकडाउन
सम तारखांना म्हणजेच ६, ८, १०, १२, १४ व १६ मे रोजी पूर्वीच्या आदेशाप्रमाणे संचारबंदी कायम राहिल, तर विषम तारखांना म्हणजेच ७, ९, ११, १३, १५ व १७ तारखेला रविवारी (ता. ३) दिलेल्या आदेशाप्रमाणे वैद्यकीय सेवा वगळता मनपा हद्दीत संपूर्ण लॉकडाउन पाळण्यात येईल. या आदेशाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

विषम तारखांना हे राहिल बंद
विषम तारखांना मनपा हद्दीतील सर्व बॅंका, एलआयसी सेवा बंद राहतील. अत्यावश्यक सेवांव्यतिरीक्त कोणत्याही व्यक्तीला मुक्तसंचार करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनुमतीने सुरु असलेले मनपा हद्दीतील पेट्रोल व डिजेल पंप वगळून अन्य सर्व पंप बंद राहतील. नगरपरिषद व ग्रामीण भागातील पेट्रोल, डिजेल पंप सुरु राहतील. एमआयडीसी येथील परवानगी दिलेले उद्योग सुरु राहतील. नगरपरिषद व ग्रामीण भागाकरीता पूर्वीचेच आदेश लागू राहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola lockdown new formula,You can only go out of the house for essential services