मुंबईकर, पुणेकर कोविडचे गंभीर रुग्ण डॉक्टरांच्या ‘निगराणीत’!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

लक्षणं नसतानाही कोरोनाग्रस्त असणे, रुग्णाभोवती कोरोनासह इतर आजारांचा विळखा असणे, कोरोनाग्रस्तांच्या वयामध्ये फरक असणे, यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसमोर वैद्यकीय पेच निर्माण होत आहे. https://www.esakal.com/news-topics/akola

अकोला  : लक्षणं नसतानाही कोरोनाग्रस्त असणे, रुग्णाभोवती कोरोनासह इतर आजारांचा विळखा असणे, कोरोनाग्रस्तांच्या वयामध्ये फरक असणे, यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसमोर वैद्यकीय पेच निर्माण होत आहे.

परिणामी रुग्णांवर उपचार करताना योग्य वैद्यकीय उपकरणांसह औषधांचा रुग्णांना योग्य डोज मिळावा यासाठी मुंबई-पुण्यातील तज्ञ डॉक्टर अकोल्यातील डॉक्टरांना टेलिमेडिसीनद्वारे उपचारा संदर्भात मार्गदर्शन करत आहेत. गंभीर स्वरूपाच्या रुग्णांन संदर्भात अशाप्रकारे उपचार होत असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या रोगामुळे जिल्ह्यातील २६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, तब्बल ४२८ वर रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर ताण वाढत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या स्थितीत रुग्णांमध्ये सुद्धा लक्षणं न दिसणे, कोरोनासह हृदयरोग, उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब, कॅन्सर, शुगर यासह इतर रोगांनी रुग्णग्रस्त असणे व रुग्णांच्या वयासह स्थितीमध्ये फरक असणे, या कारणांमुळे रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसमोर वैद्यकीय पेच निर्माण होत आहे. परिणामी रुग्णांवर योग्य उपचार न झाल्यास त्याची तब्येत आणखी खराब होण्याची शक्यता सुद्धा वाढते.

त्यामुळे अशा प्रकारच्या गंभीर रुग्णांवर योग्य उपचार व्हावा यासाठी मुंबई, पुणे व नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टर जिल्ह्यातील डॉक्टरांना टेलिमेडिसीनद्वारे मार्गदर्शन व रुग्णांवर उपचाराच्या पद्धतीची माहिती देत आहेत. त्यामुळे रुग्णांवर सुद्धा योग्य उपचार होत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

लक्षणांच्या अभावाने धोखा वाढला
साधारणतः एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास त्या व्यक्तीला ताप किंवा थंडी वाजणे, थरथरणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, खोकला, घसा खवखवणे किंवा श्‍वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्तीमध्ये १४ दिवसांपर्यत या पैकी कोणतेही दोन, तीन लक्षणं आढळू शकतात. त्यानंतर कोरोना संशयित व्यक्तीची चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला कोविड-१९ रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न होते. असे असले तरी जिल्ह्यात आढलेल्या बहुतांश रुग्णांमध्ये १४ दिवसांनंतर सुद्धा कोरोनाचे लक्षणं दिसून आले नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवाच पेच निर्माण झाला आहे.

गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर उपचार कशा पद्धतीने करावे यासाठी आम्ही मुंबई-पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेहमीच मार्गदर्शन घेतो. कोरोनाच्या गंभीर रुग्णा संदर्भात सुद्धा टेलिमेडिसीनद्वारे उपचाराच्या पद्धती व इतर बाबतीत माहिती घेण्यात येते आहे.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Mumbaikar, Punekar covid's critically ill doctor under 'supervision'!