कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर...मनपा आयुक्त जेव्हा सफाई कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन पाणी पितात...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

कोरोना निगेटिव्ह अवहाल आल्यानंतरही सफाई कर्मचाऱ्यांबाबत काही नागरिकांकडून गैरसमजुतीने शंका उपस्थित केल्या जात असल्याने मनपा आयुक्त संजय कापडणीस सफाई कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या आईने दिलेले पाणी पिले आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

अकोला : काेराेना निगेटिव्ह असलेल्या बापू नगरातील दाेन सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी रविवारी स्वत: पाणी पिले आणि परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. या कृतीतून त्यांनी कधी काळी काेराेना बाधित असलेल्या आणि नंतर निगेटिव्ह झालेल्या रुग्णांविषयी गैरसमज करून त्यांच्याशी वेगळे वागू नये, गैरव्यवहार करू नये, असा संदेश दिला.

सध्या अकाेल्यात काेराेना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काेराेना विरुद्धच्या लढाईत सफाई कर्मचारीही मैदानात उतरले आहेत. ते नियमितपणे स्वच्छता करीत आहेत. काही दिवसांपूर्वी बापू नगरात राहणाऱ्या दाेन सफाई कर्मचाऱ्यांना काेराेनाची बाधा झाल्याचे तपासणीअंती समाेर आले. त्यामुळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आवश्यक वाचा - साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असता तर, आमच्यावर ही वेळ आली नसती; चक्क पोलिस कर्मचाऱ्याने देवेंद्र फडणवीस
यांच्यासमोर...

उपचारानंतर त्यांची फेर तपासणी करण्यात आली. यात त्यांच्या तपासणीचे अहवाल निगेटिव्‍ह आल्‍याने त्‍यांना होम क्‍वारंटाईन करण्‍यात आले. मात्र परिसरातील काही नागरिकांव्‍दारे त्‍यांच्‍या परिवारासोबत गैर व्‍यवहार होत असल्‍याची माहिती मिळाल्यानंतर मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांनी 17 मे राेजी थेट बापू नगरात धाव घेतली आणि नागरिकांशी संवाद साधला.

कर्मचाऱ्यांच्या आईच्या हातूनच घेतले पाणी
बापू नगरात गेलेल्या महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी रुग्णाच्या घरात धाव घेतली. त्याच घरात ते खुर्चीवर बसले. त्यांच्या आईने आणलेले पाणी पिले. नागरिकांमध्ये काेराेना विषाणूबाबत आणि रुग्णांच्यासंदर्भात असलेले गैरसमज दूर केले. यावेळी मनपा आरोग्‍य विभागाचे विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, संघटनेचे पी.बी.भातकुले, अनुप खरारे, ननकू शुक्‍लवारे, धनराज सत्‍याल, आरोग्‍य निरीक्षक तसेच परिसरातील नागरिक उपस्थित हाेते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Municipal Commissioner gave drinking water to the house of the cleaner