बाबासाहेबांची जयंती घरीच साजरी करा- ॲड. बाळासाहेब आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचे सावट असल्याने जयंती सार्वजनिकरित्या साजरी न करता घरी राहूनच साजरी करण्याचे आवाहन ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी जनतेला केले आहे.

 

अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचे सावट असल्याने जयंती सार्वजनिकरित्या साजरी न करता घरी राहूनच साजरी करण्याचे आवाहन ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी जनतेला केले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मुख्य कार्यक्रम अकोला शहरातील अशोक वाटिका येथे आयोजित केला जातो. याशिवाय पातूर येथील बुद्ध भूमी व बौद्ध विहार व सामाजिक सभागृह  येथे हजारो अनुयायी एकत्र येवून बाबासाहेबांना अभिवादन करतात. गावोगावी शोभायात्रा काढली जाते. त्यातही शेकडो बौद्ध अनुयायी सहभागी होतात.

यावर्षी मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. धार्मिक कार्यक्रमही सार्वजनिकरित्या आयोजित न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी जनतेला सार्वजनिक ठिकाणी जयंती साजरी न करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी घरीच जयंती साजरी करा. बाबासाहेबांना अभिवानद केल्याचे फोटो, व्हिडीओ समाजमाध्यमातून व्हायलर करून जंयती साजरी केल्याचे दाखविता येईल, असेही बाळासाहेब म्हणाले.

कोरोनाग्रस्तांना मदत करा
बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी गावोगावी लोकांकडून वर्गणी गोळा केली जाते. यावर्षी सार्वजनिक जयंती उत्सव साजरे न करण्याचे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. या उत्सवासाठी गोळा झालेला निधी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी खर्च करण्याचे आवाहनही त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य जनतेला केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news celebrate the birth anniversary of Baba Saheb at home