तुम्हीच सांगा; परीक्षा न देता पदवी देणे योग्य आहे का? अंतिम वर्षाच्या परीक्षा तर हव्याच

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

परीक्षा न घेणे हा पर्याय होऊ शकत नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग ही काही एकटा महाराष्ट्राची समस्या नाही. सध्या प्रश्न संपूर्ण जगापुढे आहे. जेथे जगच थांबले आहे, तेथे आपण काही महिन्यांसाठी प्रतीक्षा करू शकत नाही का, असा प्रश्नही शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.

अकोला  : राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी युजीसीकडे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची परवानगी मागितली आहे. त्यावर शिक्षण क्षेत्रात उलट प्रतिक्रिया उमटली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता परीक्षा न घेता पदवी देणे अयोग्य असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञ डॉ. संजय खडक्कार यांनी व्यक्त केले आहे.

परीक्षा न घेणे हा पर्याय होऊ शकत नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग ही काही एकटा महाराष्ट्राची समस्या नाही. सध्या प्रश्न संपूर्ण जगापुढे आहे. जेथे जगच थांबले आहे, तेथे आपण काही महिन्यांसाठी प्रतीक्षा करू शकत नाही का, असा प्रश्नही शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.

विद्यापीठे परीक्षा घेऊ शकत नसतील तर, विद्यार्थ्यांना अशा पदव्या देऊन काय उपयोग होणार आहे. त्यापेक्षा, सर्व परीक्षा हिवाळी सत्रात घेणे कधीही योग्य होईल. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे करिअर सहा महिने समोर जाईल. पण गुणवत्तापूर्वक घेतलेली पदवीच पुढे उद्भभवणाऱ्या अनेक प्रश्नांवर उत्तर ठरणार असल्याचे ते म्हणाले.

जानेवारीपासून नवीन शैक्षणिक वर्षाचा पर्याय
विद्यापीठांना सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेता येत नसेल, अडचणी जाणवत असेल तर हे शैक्षणिक सत्र सहा महिने पुढे ढकलून हिवाळी सत्रात परीक्षा घेता येईल. त्यानंतर नवीन शैक्षणिक सत्र १ जानेवारीपासून सुरू केल्यास राज्याच्या उद्देशही पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही टळेल, असे मत डॉ. खडक्कार यांनी व्यक्त केले आहे.

बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित परीक्षा
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे परीक्षा घेणे शक्य होत नसेल तर त्यावर विद्यार्थ्यांना घरी बसूनच बहुपर्यायी प्रश्न सोडविण्यास सांगून परीक्षा घेण्याचा पर्यायही निवडता येईल. रहाला प्रश्न विद्यार्थी घरी बसून पुस्तकात बघून प्रश्न सोडविणार नाही कशावरून आणि त्यामुळे परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होणार नाही का, तर त्यावर एका तासात म्हणजे ६० मिनिटात १०० प्रश्न सोडविण्याचा पर्याय आहे. त्यामुळे पुस्तकात बघून प्रश्न सोडविण्यासाठीच वेळच मिळणार नाही, असे मतही डॉ. खडक्कार यांनी व्यक्त केले.

...तर महाविद्यालायने करावी व्यवस्था
आज प्रत्येक तरुणाच्या हातात अँड्राईड मोबाईल आहे. लॅपटाप, संगणकाचा वापरही विद्यार्थी करतात. त्यामुळे घरी बसून परीक्षा देणे अवघड नाही. ज्यांना घरी बसून परीक्षा देणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांती संख्या फारच कमी असेल. त्यांची सोय महाविद्यालयाने करण्यास कोणतीच अडचण येणार नाही, असे डॉ. खडक्कार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola news Is it right to give a degree without taking an exam? Final year exams are a must