घोषणा तीन महिन्यांची वाटप एकाच महिन्याचे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

राज्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमिवर नागरिकांची सोय व्हावी म्हणून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ ची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

 

अकोला :  करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. गरिब जनतेची गैरसोय टाळण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा छगन भुजबळ यांनी गरिबांना दोन महिन्यांचे धान्य ॲडव्हांसमध्ये देण्याचे जाहीर केले होते. परंतु लाभार्थ्यांना प्रत्यक्षात एकाच महिन्याचे धान्य वाटप रास्तभाव धान्य दुकानदार करत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी लाभार्थी व दुकानदारांमध्ये वाद होत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमिवर नागरिकांची सोय व्हावी म्हणून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ ची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याच्या धान्यासोबतच मे आणि जून महिन्याच्या धान्याचे वितरण करण्याची घोषणा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा छगन भुजबळ यांनी केली होती. परंतु सध्या जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदार केवळ एप्रिल महिन्याचे धान्य वाटप करत आहेत. त्यामुळे रेशनचे धान्य घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांसोबत काही दुकानदारांचे वाद होत आहेत.

असे आहेत जिल्ह्यातील लाभार्थी

  • जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेखालील ४५ हजार ९२३ कार्डधारक आहेत. त्यांना एप्रिल, मे, जून महिन्यात धान्य वाटपासाठी २० हजार ३४० क्विंटल गहू व २६ हजार ९०० क्विंटल तांदूळाची आवश्‍यता आहे.
  • प्राधान्य गटातील ११ लाख २९ हजार ३४० लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी ९८ हजार ६६० क्विंटल गहू व ६५ हजार ७८० क्विंटल तांदुळाची आवश्‍यकता आहे.
  • संबंधित लाभार्थ्यांना तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ आणि दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू लाभार्थांना वाटप करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात जनतेची गैरसोय टाळण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा छगन भुजबळ यांनी गरिबांना दोन महिन्यांचे धान्य ॲडव्हांसमध्ये देण्याचे जाहीर केले होते. परंतु लाभार्थ्यांना आता एकाच महिन्याचे धान्य वाटप करण्यात येत आहे. यासंबंधीचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत.
- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola no grain in ration shops