देणाऱ्याने देत जावे...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता-घेता एकदिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे, कवी विं.दा. करंदीकर या ओळींची आज पावलो पाऊली गरज निर्माण झाली आहे. 

अकोला : देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता-घेता एकदिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे, कवी विं.दा. करंदीकर या ओळींची आज पावलो पाऊली गरज निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी हजारो शासकीय अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे या परिस्थितीमध्ये रस्त्यांवरचे जीणं जगणाऱ्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत मदत म्हणून गांधीग्राम येथील प्रसिद्ध राजलक्ष्मी गुळपट्टी व ‘सकाळ’च्या वतीने गुरुवारी (ता.२) सकस आहार रामनवमीच्या पर्वावर गुळपट्टीचे वितरण करण्यात आले.

कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी देशभर २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात अनेकांची उपासमार होताना दिसत आहे. ही उपासमार होऊ नये आणि जो मिळतोय तो आहार सकस मिळावा या हेतूने गांधीग्राम येथील राजलक्ष्मी गुळपट्टी, एम.जी. गृप सामाजिक संस्था आणि सकाळच्या वतीने गुरुवारी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना गुळपट्टीचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे रामनवमी आणि गुरुवारचा उपास असलेल्यांना ही पर्वणीच ठरली. तर हा उपक्रम पुढील काही दिवस अश्‍याच पद्धतीने सुरू राहणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

कर्तव्यावरील पोलिसानाही गुळपट्टीचे वितरण
राजलक्ष्मी गुळपट्टी, एम.जी. गृप सामाजिक संस्था आणि सकाळच्या वतीने या उपक्रमाच्या माध्यमातून जीवाची पर्वा न करता रस्त्यावर कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना गुळपट्टीचे वितरण करण्यात आले. यामध्ये टॉवर चौक, रेल्वे स्टेशन चौक आणि सिव्हिल लाईन्स चौकात, बसस्थानक चौक आणि खदान चौकातील पोलिस कर्मचाऱ्यांना गुळपट्टीचे वितरण करण्यात आले. या गुळपट्टीचे वितरण सकाळ वऱ्हाड आवृत्तीचे निवासी संपादक संदीप भारंबे, राजलक्ष्मी गुळपट्टीचे सुखदेवराव आढाऊ आणि एम.जी. गृपचे सदस्य रामदासपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे, खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे आणि इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola sakal and Rajalakshmi gulpatti activities to help the needy