प्रेरणादायी: दिव्यांग असूनही शैलेशने केली गरजूंना मदत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

दहिगाव गावंडे येथील एका हाताने दिव्यांग असलेल्या शैलेश पोहुरकर याने दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजनेतून जमा केलेला काही दिव्यांग निधी आणि स्वतः जवळील पैसे यातून गावातील हातावर पोट असलेल्या गरजू नागरिकांना धान्य सह किराणा साहित्य दिले.

 

अकोला : सध्या कोविड-19, कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मुळे लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे गरीबांच्या हाताला काम नाही. अनेकांचे व्यवसाय, रोजगार बंद आहेत. त्यामुळे अनेकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. ही बाब पाहता गरजूंना मदतीचा हात म्हणून अकोल्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या दिव्यांग शैलेशने गावातील गरजूंची यादी करून त्यांना धान्याची किट उपलब्ध करून दिली.

दहिगाव गावंडे येथील एका हाताने दिव्यांग असलेल्या शैलेश पोहुरकर याने दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजनेतून जमा केलेला काही दिव्यांग निधी आणि स्वतः जवळील पैसे यातून गावातील हातावर पोट असलेल्या गरजू नागरिकांना धान्य सह किराणा साहित्य दिले. लॉकडाऊनमुळे सध्या हातावर पोट असणाऱ्यांच्या हाताला काम नाही. घरात अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या दिव्यांग शैलेशने सुरुवातीला गावातील गरजूंची यादी तयार केली. नंतर त्यांना धान्याची किट उपलब्ध करून दिली. यामध्ये, प्रत्येकी चार किलो गहू, दोन किलो तांदूळ, अर्धा किलो तेल, एक किलो मिठ यासोबतच जंतुनाशक साबण असलेल्या किटचेही गरजुंना वाटप केले. गावातील एक दिव्यांग व्यक्ती सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याने शैलेशचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola village dahigaon handicap Shailesh helped the needy