सावधान: तुम्ही फसव्या लिंकवर तर क्लिक करीत नाही ना!, सायबर हल्लेखोरांनी पसरवल्या आहेत फसव्या लिंक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

अलीकडे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यातच मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊनच्या काळात इंटरनेट वापराचे प्रमाणही वाढले आहे

अकोला  ः अलीकडे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यातच मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊनच्या काळात इंटरनेट वापराचे प्रमाणही वाढले आहे. याच संधीचा फायदा घेऊन सायबर हल्लेखोरांनी काही फसव्या लिंक तयार केल्या आहेत. या लिंकव्दारे आर्थिक फसवणूक होऊ शकते किंवा तुमच्या मोबाइलमधील डेटासुध्दा चोरी होऊ शकतो, त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींनी फसव्या लिंकपासून सावधान राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

सद्यास्थितीत अनेक मोबाइल वापरकर्त्यांना विविध योजनेंतर्गत रजिस्ट्रेशन केल्यास महिन्याकाठी साडेतीन हजार रुपये देण्यात येईल. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नावनोंदणी केल्यास २५ हजार रुपये प्रतिमहिने मिळत असल्याची योजना असे मॅसेज व त्यासाठी फसव्या लिंक अनेकांना प्राप्त होत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सोबत असलेल्या लिंकवर क्लिक करून तुमची संपूर्ण माहिती भरण्यासाठी सांगितली जाते. तसेच सदर फसवी लिंक पाच परिचितांना पाठवण्यास सांगितली जाते. त्यानंतर फॉर्म सबमिशन योग्य पध्दतीने झाले किंवा नाही, यासाठी एक संशयित अॅप डाऊनलोड करायला सांगितले जाते. हे अॅप डाऊनलोड करताना तुमची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते किंवा काही अॅप असेही आहेत की, ते अॅप डाऊनलोड करून ओटीपी शेअर केल्यानंतर सायबर हल्लेखोर त्याच्या मोबाइलवरील माहितीचा गैर उपयोग करू शकतो.

चोरलेला डेटा विकला जातो
अनेकदा अशा फसव्या लिंकव्दारे थेट आर्थिक फसवणूक होत नाही किंवा केली जाऊ शकत नाही. मात्र फॉर्म भरण्यासाठी सांगून संपूर्ण माहिती घ्यायची, त्यानंतर सदर लिंक आणखी पाच व्यक्तींना पाठवायला सांगायची, त्यानंतर ऐनी डेस्क, क्विक सपोर्ट किंवा असे अन्य काही अॅप आहेत, ते डाऊनलोड करण्यासाठी सांगून त्याव्दारे मोबाइलमधील संपूर्ण माहिती गोळा करून विक्री करणाऱ्यांना यासाठी सायबर हल्लेखोर किंवा डेटा विकत घेणारा पैसे देत असल्याची माहिती आहे. अशा प्रकारचे योजनांची माहिती देणारे, फसवे मेसेज सध्या फिरत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Warning: You are not clicking on fraudulent links, are you?

Tags
टॉपिकस
Topic Tags: