'शाळा बंद, पण शिक्षण नाही बंद', जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी पहा कसा राबविला उपक्रम?

अविनाश बेलाडकर
Thursday, 16 April 2020

'शाळा बंद, पण शिक्षण बंद नाही', हे ब्रीद सार्थ ठारवित या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या एका केंद्रातील शिक्षक लॉक डाऊन च्या काळातही झूम ॲप च्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अविरत सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्नरत आहेत. 

 

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : 'शाळा बंद, पण शिक्षण बंद नाही', हे ब्रीद सार्थ ठारवित या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या एका केंद्रातील शिक्षक लॉक डाऊन च्या काळातही झूम ॲप च्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अविरत सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्नरत आहेत. 

या तालुक्यातील नागठाणा केंद्रातील शिक्षकांची या संदर्भातील पहिली बैठक मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊन २० मार्चपासून झूम ॲपच्या माध्यमातून हा शैक्षणिक उपक्रम सुरू झाला. सर्व मुख्याध्यापक, सीआरजी सदस्य, साधनव्यक्ती आणि केंद्र प्रमुख या ऑनलाईन चर्चेत सहभागी झाले. लॉकडाऊन दरम्यान विद्यार्थ्यांचे व आपलेही (शिक्षकांचे) ज्ञान-शैक्षणिक नुकसान होऊ नये, असा सूर चर्चेतून उमटला.

लगेच सारे कामाला लागले. सर्व शाळांमध्ये पालकांचे व्हॉटस् ॲप गृप तयार झाले. शिक्षक दररोज मार्गादर्शन करतात. गृहपाठ देतात. पालक सुद्धा आपल्या पाल्यांचा झालेला अभ्यास (फोटो कॉपी काढून) ग्रुपवर टाकतात व शिक्षक तो तपासून मूल्यमापन करतात. या ग्रुपवर इ-शैक्षणिक साहित्य, ऑनलाईन चाचण्या, शब्दकोडे, गणिताधारे कोडे, चित्रकाम, कलाकृती मुलांना पाठविण्यात येतात. ज्या पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत, अशा पालकांच्या पाल्यांना या शिक्षण सुविधेपासून वंचित न ठेवता त्यांच्या पाल्यांसोबत कॉल कॉंफरन्स द्वारे संवाद साधण्यात येतो, मात्र त्यांना वंचित ठेवल्या जात नाही. घरी रहा- सुरक्षित रहा आणि सोबत अभ्यासही करा, असा शिक्षणमंत्र घेऊन हा अनुकरणीय उपक्रम या केंद्रात सुरू आहे.

-या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सीआरजी सदस्य तसेच विषय साधनव्यक्तींचा समन्वयक सहभाग मिळत आहे. विषय साधन व्यक्ती मोनाली सौंदाडे, तंत्रस्नेही शिक्षक भूषण भडांगे यांचे या उपक्रमाच्या आखणीत मोलाचे योगदान आहे. विद्याथी व पालकांचा प्रतिसाद उत्तमा आहे.
 -दिलीप सरदार, केंद्र प्रमुख, केंद्रशाळा, नागठाणा.

दररोज सकाळी १० ते ११ गृहपाठ व्हॉटस् ॲप वर दिला जातो. दुपारी २ वाजता शिक्षकांची आॉनलाईन साप्ताहिक सभा होते. केंद्रातील सर्व शाळांच्या आठावडाभराच्या कामाचा आॉनलाईन आढावा घेतला जातो. पुढचे नियोजन ठरते. पुढे विद्यार्थ्यांची आॉनलाईन टेस्ट घेतली जाईल. 
-भूषण भडांगे, तंत्रस्नेही शिक्षक 

हा उपक्रम अतिशय  फायद्याचा ठरत आहे शाळा बंद असून सुद्धा  मुलांचा अभ्यास सुरूच आहे, मुले रोज अभ्यासाला बसतात.
 -गोपाल महानूर ,अध्यक्ष  शाळा व्यवस्थापन समिती, जी प प्राथ शाळा मलकापूर

कोरोना संसर्गजन्य आजार सुरक्षा उपाययोजना म्हणून शाळांना सुटी देण्यात आली आहे. सुटीच्या कालावधीत विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जि. विद्यालय ,माना येथील  व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगल्याप्रकारे घेत असून त्यांचा विद्यार्थ्यांना चांगला शैक्षणिक लाभ मिळत आहे.

-अजाबराव गुडदे, पालक, माना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola zp teachers offers online education at murtizapur