बापरे! दहा दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या या जिल्ह्याने ओलांडला कोरोनाचा अर्धशतकी टप्पा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 37 अहवाल आज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 35 अहवाल कोरोना निगेटिव्ह, तर 2 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

बुलडाणा : राज्यात सगळीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना बुलडाणा ही त्याला अपवाद राहिलेले नाही. दहा दिवसापूर्वी कोरोना मुक्त झालेल्या बुलडाणा जिल्ह्याने गेल्या आठवड्यात एकामागून पॉझिटिव्ह रुग्ण सापडत गेल्याने अर्धशतकी टप्पा पार केला आहे. एकूण पन्नास पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 28 जणांनी या आजारावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. आजमितीला जिल्ह्यात 19 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 37 अहवाल आज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 35 अहवाल कोरोना निगेटिव्ह, तर 2 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये निमखेड ता. देऊळगावराजा येथील 22 वर्षीय तरुण आणि मलकापूर येथील 38 वर्षीय पुरुष आहे. निमखेड ता. देऊळगावराजा येथील तरुणाचा मुंबई प्रवास इतिहास आहे. तसेच शेगाव येथील एका महिला रुग्णाला आज कोविडचे मागील दहा दिवसांपासून कुठलेही लक्षणे नसल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

हेही वाचा - Breaking : लातूर पोलिस ट्रेनिंग कॅम्पमधून आलेला युवक बाधीत; या तालुक्यात पुन्हा कोरोना प्रवेश

आतापर्यंत 1015 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 50 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आज शेगाव येथील 30 वर्षीय एका कोरोनाबाधीत रुग्णाला वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 28 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

महत्त्वाची बातमी - अरे बापरे! या शिलेदारांना ना झोप ना सुट्टी; वरिष्ठ पोलिस निरीक्षक पडले मुर्च्छीत

अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 28 आहे. सध्या रुग्णालयात 19 कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज 27 मे रोजी 37 अहवाल प्राप्त झाले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1015 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली.

झोन कोणता
बुलडाणा जिल्ह्यामध्ये पन्नास रुग्ण आजवर पॉझिटिव्ह आढळले असले, तरी जिल्हा सध्या रेडझोनमध्ये आहे की नाही? याबाबत मात्र साशंकता आहे. शासनाचे स्पष्ट निर्देश नसल्याने अशी घोषणा आजवर झालेली नाही. जिल्ह्यात समूह संसर्ग झाल्याची नोंद नाही. बाहेरून आलेल्यांमुळेच ही रुग्ण संख्या वाढत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: buldana district crossed the Corona positive half-century stage