esakal | आपत्ती काळात अन्नधान्य पुरवठ्यात गडबड
sakal

बोलून बातमी शोधा

buldana file a complaint against cheap grain shopkeepers

ध्या कोविड 19 या साथीच्या रोग प्रसारामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतानाही तालुक्‍यातील एका स्वस्त धान्य दुकानदाराने जादा दराने तसेच प्रमाणापेक्षा कमी अन्नधान्य वितरण केल्याचा प्रकार 8 एप्रिलला उघड झाला होता.

आपत्ती काळात अन्नधान्य पुरवठ्यात गडबड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंदखेडराजा (बुलडाणा) : सध्या कोविड 19 या साथीच्या रोग प्रसारामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतानाही तालुक्‍यातील एका स्वस्त धान्य दुकानदाराने जादा दराने तसेच प्रमाणापेक्षा कमी अन्नधान्य वितरण केल्याचा प्रकार 8 एप्रिलला उघड झाला होता.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यातून यंत्रणेमार्फत दुकानदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्वस्त धान्य दुकानाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. तालुक्‍यातील सोनोशी येथील शिवानंद गजानन आघाव या अंत्योदय शिधापत्रिकाधारक शेतकऱ्याने स्वस्त धान्य दुकानदार भास्कर वामन साळवे यांचेकडून गहू व तांदूळ घेतले. त्यावेळी साळवे यांनी धान्य कमी दिल्याचे तसेच रक्कमही जादा घेतल्याचा प्रकार घडला. 

या प्रकरणाचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला. त्याची तक्रार पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावरून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी घेत प्रकरणाची चौकशी व कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी पुरवठा विभागाचे संदीप दिनकर बंगाळे, मंडळ अधिकारी केवट व तलाठी कटरे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यात सोनोशी येथील स्वस्त धान्य दुकानदार भास्कर वामन साळवे हे दोषी असल्याचे स्पष्ट झाले.तेव्हा त्यांचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करीत, गावातीलच अन्य दुकानदाराकडे शिधापत्रिका धारकांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. तसेच संदीप बंगाळे यांनी किनगाव राजा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दुकानदार भास्कर वामन साळवे यांच्याविरुद्ध जीवनावश्‍यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7, साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 56 व भादंवि 1860 च कलम 188 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सिंदखेड राजा तालुक्‍यातील नागरिकांनी स्वस्त धान्य घेत असताना दुकानदाराने शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम मागितली तर तहसील कार्यालयाशी संपर्क करावा. तत्काळ स्वस्त धान्य दुकानदार यावर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. संतोष येवलीकर, तहसीलदार, सिंदखेड राजा.

loading image