कोरोनाने मारले अन् या व्यवसायाने तारले, लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या शेकडो युवकांना मिळतोय रोजगार

अनुप ताले 
Wednesday, 13 May 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आणि या दीर्घ लॉकडाउनने जिल्ह्यातील शेकडो युवकांना बेरोजगार करून टाकले. मात्र अशा परिस्थितीत त्यांना साथ मिळाली भाजीपाला, फळे, शेतमाल विक्री व्यवसायाची आणि या व्यवसायानेच त्यांना तारले असून, त्यातून शेकडो युवकांना रोजगार प्राप्त होत आहे.

 

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आणि या दीर्घ लॉकडाउनने जिल्ह्यातील शेकडो युवकांना बेरोजगार करून टाकले. मात्र अशा परिस्थितीत त्यांना साथ मिळाली भाजीपाला, फळे, शेतमाल विक्री व्यवसायाची आणि या व्यवसायानेच त्यांना तारले असून, त्यातून शेकडो युवकांना रोजगार प्राप्त होत आहे.

जिल्ह्यातील हजारो तरुण, तरुणींनी रोजगारासाठी पुणे, मुंबई, नागपूर, दिल्ली व इतर मोठी शहरे गाठली होती. जिल्ह्यांतर्गतही खासगी कंपन्या, उद्योगांमध्ये हजारोंच्या संख्येने युवावर्ग काम करत होता. परंतु, अचानक देशात कोरोना विषाणूने संकट आले आणि या मोठ्या शहरांसह अकोला जिल्ह्यातही कोरोनाने शिरकाव केला. या विषाणूच्या थैमानात अनेकांचे बळी सुद्धा गेले.

वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि तो रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, खासगी कंपन्यांवर मोठा परिणाम झाला आणि या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या शेकडो युवकांना त्यांचा रोजगार गमवावा लागला व त्यांना बेरोजगार करून टाकले. लॉकडाउनला आता दीड महिण्याहून अधिक कालावधी झाला असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली. मात्र अशा बिकट परिस्थितीत शेतकरी व शेती उत्पादनाने या युवकांना साथ दिली असून, सध्या शेकडो युवकांनी रस्त्याच्या कडेला, चौकांमध्ये, गावागावात भाजीपाला, फळे व शेतमाल विक्री व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायातून त्यांना बऱ्यापैकी रोजगार सुद्धा प्राप्त होत आहे.

शेतमाल विक्रीची गुंफली साखळी
बहुतांश भागात लॉकडाउन, संचारबंदीमुळे लोकांना घरा बाहेर पडणे कठीण झाले आहे. शिवाय कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती लक्षात घेता, लोकांनी घरीच थांबण्याचे आवाहन सुद्धा प्रशासनाने केले आहे. आशा स्थितीत लोकांना घरपोच भाजीपाला, फळे, शेतमाल पोहोचण्याची जबाबदारी या युवा वर्गाने घेतली असून, त्यासाठी एक आदर्श साखळीच शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या साखळीद्वारे नागरिकांना घरीच ताजा व खात्रीचा शेतमाल मिळत आहे तर, या साखळीत काम करणाऱ्या युवा वर्गाला चांगला रोजगार प्राप्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona kills another business, lockdown brings jobs to hundreds of unemployed youth in Akola