COVID19 : कसा होतो कोरोनाच्या स्वॅबचा लॅबपर्यंत प्रवास?; कशी होते बाधित असल्याची खात्री?...वाचा

भगवान वानखेडे
Monday, 25 May 2020

प्रतिबंधित क्षेत्रातील किंवा कोरोना आजाराची लक्षणे असलेले रुग्ण तपासणीसाठी आल्यानंतर त्यांची सुरुवातीला ट्यूब घेऊन त्याच रुग्णासाठीची ही ट्यूब आहे का याची खात्री केली जाते.

अकोला : आपण दररोज सकाळी किती अहवाल पाॅझिटिव्ह आणि किती अहवाल निगेटिव्ह आले. याबाबतची उत्सुकता असते. पण हे अहवाल तपासणाऱ्या सुक्ष्म जीवशास्त्र विभागाला 24 तास डोळ्यात तेल घालून काम करावे लागत असून, ऐवढेच नव्हे तर एकदा आलेले पाॅझिटिव्ह अहवाल निश्चित करण्यासाठी पुन्हा तपासले जात असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील किंवा कोरोना आजाराची लक्षणे असलेले रुग्ण तपासणीसाठी आल्यानंतर त्यांची सुरुवातीला ट्यूब घेऊन त्याच रुग्णासाठीची ही ट्यूब आहे का याची खात्री केली जाते. एका वेगळ्या कक्षात रुग्ण नेऊन घसा व नाक यातील स्राव घेतला जातो. डॉक्टर, तंत्रज्ञ हे स्वॅब घेतात. स्वॅब घेताना रुग्णाला फारसा त्रास होत नाही. 

आवश्यक वाचा - धक्कादायक! विदर्भातील हा जिल्हा पुन्हा रेडझोनकडे; एकाच कुटुंबातील 7 जण कोरोना पाॅझिटिव्ह

आरएनए पीसीआर (पॉलिमरिक चैन रिॲक्शन) प्लेटमध्ये टाकतात. या प्लेटला 96 छिद्र असतात. 92 छिद्रात 46 स्वॅब टाकले जातात, उर्वरित 4 पैकी 2 मध्ये लॅबचे इंटरनल पॉझिटिव्ह तर 2 मध्ये रसायन टाकले जाते. याला दीड तास लागतो. ज्या ट्यूबमध्ये रुग्णाचा स्वॅब पाठवायचा आहे. त्या ट्यूबवर लेबलिंग केले जाते. 

त्यावर रुग्णाचे नाव, नंबर, लॅबच्या डॉक्टरांचे नाव यासह इतर बाबी नमूद कराव्या लागतात. डाटा एन्ट्री ऑपरेटर, तंत्रज्ञ व डॉक्टर हे काम करतात. जर एका आरएनएचे अनेक होऊन निश्चित केलेल्या एका ठराविक ब्रेक पॉइंटच्यावर आलेख गेला तर तो पॉझिटिव्ह समजला जातो. निगेटिव्ह असेल तर आरएनएची संख्या वाढत नाही. कोरोना तपासणी प्रक्रियेला सहा तास लागतात.

असा होतो स्वॅबचा लॅबपर्यंत प्रवास
स्वॅब घेतल्यानंतर तो 2 ते 8 अंश सेल्सियस तापमानात ठेवतात. 48 तास तो चांगला राहू शकतो. स्वॅब सकाळी 9 पूर्वी प्रयोगशाळेत पाठवला जातो. त्यामुळे स्वॅब घेण्याची प्रक्रिया रात्रीपासून पहाटेपर्यंत चालते. घेतलेला स्राव (स्वॅब) हा ज्या ट्यूबमध्ये भरला जातो. तिला व्हीटीएम (व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम) ट्यूब म्हटले जाते. यातूनच ट्यूबमधून तो तपासणीसाठी पाठवला जातो.

सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे कर्मचाऱ्यांची रोजच परीक्षा
अकोला येथे उभारण्यात आलेल्या कोरोना विषाणू चाचणी लॅबचे प्रमुख सध्या डाॅ. नितीन अंभोरे असून, त्यांना डाॅ. रुपाली मंत्री यांच्यासह त्यांची टीम सहकार्य करीत आहेत. सध्या या लॅबमध्ये चोवीस तास काम केले जात असून, एकही अहवालाची चुकीचा तपासल्या जाऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive report was re-examined for confirmation in akola lab