वो शमा क्या बुझे, जिसे रोशन खुदा करे...तीन वर्षांच्या बालकाची अशीही चिवट झुंज!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

कोरोना म्हणजे काय? हे ही कदाचित त्या बालकाला माहिती नसावे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कातून त्यालाही कोरोनाची लागण झाली.

अकोला : फानूस बनके जिसकी, हिफाजत हवा करे, वो शमा क्या बुझे, जिसे रोशन खुदा करे! शायर मचली शहरी यांच्या या ओळी शब्दशः सार्थ ठरविल्या त्या एका तीन वर्षांच्या बालकाने.  तब्बल एक महिने कोरोनाशी चिवट झुंज देऊन, त्याने आज विजयी मुद्रेने रुग्णालयाबाहेर पाऊल ठेवले. यावेळी सर्व डॉक्टर्स आणि उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला टाळ्या वाजवित निरोप दिला.

कोरोना म्हणजे काय? हे ही कदाचित त्या बालकाला माहिती नसावे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कातून त्यालाही कोरोनाची लागण झाली. संपर्काच्या चाचण्या प्रशासनाने घेतल्या तेव्हा त्यात हा दि. 7 एप्रिल रोजी आलेल्या अहवालात पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झालं. साहजिकच लहान असल्याने त्याची झुंज मोठ्या विषाणूशी होती. आज तब्बल एक महिन्याने त्याला या झुंजीत विजय मिळाला. या दरम्यान त्याची तब्येत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अहवालांच्या दोन टोकांमध्ये हेलकावे खात होती. 

महत्त्वाची बातमी - अकोल्यात एकाच दिवशी कोरोनाने चार मृत्यू; चिंतेसह चिंतन करण्याची वेळ

या दरम्यान या बालकाच्या एक नव्हे दोन नव्हे तब्बल आठ चाचण्या झाल्या. त्यातल्या पहिल्या चार तर पॉझिटिव्ह आल्या. पाचवी चाचणी निगेटिव्ह आली. पुन्हा आशा उंचावली. मात्र, पाच दिवसांनी घेतलेली सहावी चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आली. 24 तासानंतर सातवी चाचणी पुन्हा निगेटिव्ह आली. त्यानंतर पुन्हा पाच दिवसांनी दि.2 मे रोजी झालेली चाचणी निगेटीव्ह आली. त्यानंतरही त्याच्या एक्स रे सहित विविध चाचण्या घेऊन चार दिवस त्याला पुन्हा डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले. 

हेही वाचा - माजी गृहराज्यमंत्र्यांची कन्या पुण्यात देतेय कोरोनाविरुद्ध लढा; फ्रंट लाईन वॉरियर म्हणून अविरत सेवा

सर्व तपासण्या आणि चाचण्यांचे अहवाल समाधानकारक आल्यानंतरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड उपचार पथकाने आज या बालकाला पूर्ण बरा झाल्यानंतर निरोप दिला. आता हा बालक 14 दिवस घरातच क्वारंटाईन करून राहिलं. त्याने ज्या चिवटपणे कोरोना विरुद्ध झुंज दिली. त्याची जिद्द वाखाणण्यासारखीच आहे. डॉक्टरांनीही जिद्दीने उपचारांची शर्थ केली.

त्याला कोरोनाच्या जबड्यातून बाहेर काढलंच. इथच कोरोना हरला! या लहानग्या रुग्णाला निरोप देण्यासाठी अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, उप अधिष्ठाता डॉ.अनिलकुमार बत्रा, डॉ.अपुर्व फावडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शामकुमार सिरसाम, डॉ.अपर्णा वाहाने, वैद्यकीय उप अधीक्षक डॉ.दिनेश नैताम व इतर सर्व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid treatment team said goodbye to the child after a full recovery in akola