
अकोल्यात चौथ्या लॉकडाउनमध्ये नऊ दिवसात तब्बल 215 रुग्ण वाढल्याने प्रशासकीय स्तरावर संसर्ग नियंत्रणासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनाच संशयाच्या भौवऱ्यात सापडल्या आहेत.
अकोला: कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कोणताही उपयोग होताना दिसत नाही. उलटपक्षी अकोल्यात चौथ्या लॉकडाउनमध्ये नऊ दिवसात तब्बल 215 रुग्ण वाढल्याने प्रशासकीय स्तरावर संसर्ग नियंत्रणासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनाच संशयाच्या भौवऱ्यात सापडल्या आहेत.
कोरोना विषाणू कोविड-19 चे संसर्गीत रुग्ण आढळत असल्यामुळे देशभरात 24 मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले. विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी आतापर्यंत तब्बल चारवेळा त्याला मुदतवाढ देण्यात आली. चौथा लॉकडाउन 17 मेपासून सुरू झाला. अकोल्यासाठी मात्र हा चौथा लॉकडाउन चांगलाच घातक ठरला आहे. चौथ्या लॉकडाउनमधील पहिल्या नऊ दिवसांतच अकोल्यात तब्बल 215 नवीन संसर्गीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
प्रतबिंधत क्षेत्रातील उपाययोजनांचा पुनर्विचार आवश्यक
प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजनांवर नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. आतापर्यंत चार लॉकडाउन करण्यात आले, संचारबंदी लागू आहे, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर नागरिकांना पडण्यास मनाई आहे. असे असतानाही अकोला शहराच्या सर्वच भागात कोरोना विषाणूंचा संसर्ग पसरताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत कोरोना मुक्त असलेला अकोट व तेल्हारा तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी नव्याने विचार करावा लागणार आहे.
सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती हाच पर्याय
अकोला महानगरपालिका हद्दीसह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गीत रुग्ण आढळत असल्याने उपाययोजनांवर फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन व पोलिस विभाग या तिन्ही यंत्रणांमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती राज्य शासनाने करावी, अशी मागणी पुढे येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, माजी नगरसेवक गोपी ठाकरे, शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार नितीन देशमुख, आमदार गोपीकिशन बाजोरिया आदींनी अकोल्यात नोडल अधिकारी नियुक्तीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
चौथ्या लॉकडाउनमध्ये अशी वाढली रुग्ण संख्या
17 मे ः 37
18 मे ः 04
19 मे ः 18
20 मे ः 29
21 मे ः 33
22 मे ः 14
23 मे ः 23
24 मे ः 19
25 मे ः 18
26 मे ः 20