दोन चौरस किलोमीटरमध्येच प्रतिबंधित क्षेत्र, प्रभाव मात्र संपूर्ण शहरावर; या महानगरपालिका हद्दीत इतके कन्टेन्मेंट झोन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

अकोला शहरात गेले 24 मार्चपासून संपूर्ण लॉकडाउन आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तरी इतर व्यवहार बंद आहेत. कालांतराने त्यात काही सुट देण्यात आली.

अकोला : महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कन्टेन्मेंट अर्थात प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे. सध्या शहरात एकूण 32 कन्टेन्मेंट झोन आहे. मात्र त्याचे एकूण क्षेत्रफळ हे शहराच्या एकूण 128 चौरस किलोमीटर परिसरापैकी अवघे 2 चौरस किलोमीटर परिसरापुरतेच मर्यादित आहे. असे असले तरी त्याचा प्रभाव मात्र संपूर्ण शहरावर असल्याने येथील व्यवहार ठप्प आहेत. रस्त्यावर होणारी नागरिकांची गर्दी बघता आठ दिवसाचा जनता कर्फ्यूचा पर्याय निवडावा असाही एक मतप्रवाह सध्या दिसून येत आहे.

अकोला शहरात गेले 24 मार्चपासून संपूर्ण लॉकडाउन आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तरी इतर व्यवहार बंद आहेत. कालांतराने त्यात काही सुट देण्यात आली. ज्यात प्रामुख्यांने बँक व्यवहारासाठीची वेळ वाढवून देणे प्रमुख होते. मात्र भाजीबाजारात होणारी नागरिकांची गर्दी पाहता एका जागी होणारे भाजी विक्रीचे व्यवहार थांबविण्यात आले. केवळ होलसेल भाजीबाजारच सुरू ठेवण्यात आला. त्याचे चांगले परिणामही दिसून आले. 

आवश्यक वाचा - ट्रकमधून येत होती दुर्गंधी; नागरिकांनी थांबवून पाहणी केल्यास समोर आले धक्कादायक चित्र

मात्र कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने शहरातील रुग्ण संख्याही वाढत आहे. बैदपुरा हा समूह संसर्गाचे केंद्र ठरला. त्यानंतर माळीपुरा, गवळीपुरा आणि खैर महम्मद प्लॉटमध्येही समूह संसर्गाचा धोका वाढला. त्यामुळे या तीन क्षेत्रावर आता जास्त लक्ष केंद्रीत केले जात आहे. शहरातील कन्टेन्मेंट झोनची संख्या वाढली असली तरी त्याचे एकूण क्षेत्रफळ मात्र कमी असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे काम नसल्याचे मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी सांगितले.

हेही वाचा - वाह! याला म्हणतात वेळेचा सदुपयोग, तो पण चक्क शाळेत क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींकडून...वाचा

सर्वात मोठे प्रतिबंधित क्षेत्र 0.37 चौरस किलोमीटर
अकोला शहरातील सर्वात मोठे प्रतिबंधित क्षेत्र बैदपुरा आहे. शासनाच्या नियमानुसार कोरोना रुग्ण आढलेल्या परिसरापासून तीन किलोमीटरपर्यंत संपूर्ण व्यवहार बंद करणे आवश्यक आहे. मात्र अकोला शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता या नियमानुसार कन्टेन्मेंट झोन तयार करणे अशक्य होते. परिणामी शहरातील सर्वात मोठा कन्टेन्मेंट झोन असलेल्या बैदपुराचे प्रतिबंधित क्षेत्रफळ 0.37 चौरस किलोमीटर असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. इतर सर्व क्षेत्रफळ मिळून दो ते अडीच चौरस किलोमीटरपर्यंतच हे क्षेत्र मर्यादित आहे.

लवकरच पुनर्विचार
शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची संख्या वाढत असली तरी काही क्षेत्रात एकदा रुग्ण आढल्यानंतर दीर्घकाळ तेथे रुग्ण आढळले नसेल तर त्या क्षेत्राचा पुनर्विचार करण्याबाबत लवकरकच निर्णय घेतला जाण्याचे संकेत आहेत. यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाकडे विनंती केली होती. यात प्रामुख्यांने नगरसेवक होते. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राची संख्या कमी होऊन नागरिकांना सुविधा देणे शक्य होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Currently the akola city has a total of 32 containment zones