कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आवश्‍यक असलेल्या औषध खरेदीत घडला हा प्रकार; आता अशी राबवणार औषध खरेदीची प्रक्रिया

सुगत खाडे
Sunday, 24 May 2020

जिल्ह्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. शहारांनंतर गाव-खेड्यातही कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.

अकोला : महानगरानंतर कोरोना विषाणू आता गाव-खेड्यातही पोहचला आहे. कोरोनाचे ग्रामीण भागातील 10 पेक्षा अधिक नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व्हेक्षणासह इतर प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. परंतु रुग्ण संख्या आढळण्याआधीच औषध खरेदीची प्रक्रिया न राबविता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आता औषध व इतर साहित्य खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्य तत्परतेवर आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. शहारांनंतर गाव-खेड्यातही कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. असे असले तरी विषाणू धुमाकूळाच्या या स्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासह रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्‍यक असलेले औषध व इतर साहित्य अद्याप जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने खरेदीच केले नाही. 

आवश्यक वाचा - थरारक! या कारणामुळे त्याने तीनशे मीटर मृतदेह नेला फरफटत आणि...

कोरोना विषाणूच्या शिरकावाला 60 दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी झाल्यानंतर सुद्धा अद्याप रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्‍यक असलेले लहान-मोठ्या साहित्य, औषधे व इतर बाबींच्या खरेदीची प्रक्रियाच आरोग्य विभागाने राबविली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असताना आता आरोग्य विभागामार्फत औषधांसह इतर साहित्य खरेदीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ प्रवाशांच्या तपासणीच्या कामातच आरोग्य विभाग व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - अरेरे! मोफत मिळतोय तांदुळ तरी होतोय गैरप्रकार; त्या तांदुळाच्या बदल्यात...

निधी उपलब्ध असूनही लेटलतीफी
जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला कोविड-19 साठी उपाययोजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामध्ये जवळपास 80 लाख रुपयांच्या अखर्चित निधीचा समावेश आहे. निधी उपलब्ध असल्याने विभागाने वेळेपूर्वीच औषध व इतर साहित्य खरेदीची प्रक्रिया राबविणे आवश्‍यक होते. परंतु आता प्रक्रिया सुरु केल्यामुळे आरोग्य विभागाचे कोरोनासंदर्भात गांभीर्य दिसून येत आहे.

या साहित्याची आहे आवश्‍यकता
व्हीटीएम कीट 825, एन-85 मास्क 6 हजार 600, पीपीई कीट 1 हजार 550, प्लास्टिक गाऊन 33 हजार, इटोफायलिन-सिओफायलिन 1 लाख 65 हजार, पॅरासिटॉमल 10 लाख, रबर ग्लोज 33 हजार, अजिप्रोमायसिन टॅबलेट्स 66 हजार, सेप्रिझिन टॅब 6 लाख 60 हजार, रुम एअर प्युरिफायर 31

औषधे व साहित्यांची खरेदी करण्यात येत आहे
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला आतापर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून साहित्य देण्यात आले. परंतु आता शासनाने साहित्य खरेदी करण्याचे निर्देश दिल्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक व आवश्‍यक औषधे व साहित्यांची खरेदी करण्यात येत आहे.
- डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The drug procurement process to be implemented now by health department in akola