कोरोनामुळे सारेच बंद...खवय्यांसाठी मग घरातूनच सुरू होती मत्स्य विक्री

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

सलग 41 दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मांसाहारींची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे मिळेल तेथून मांस किंवा मासोळी मिळविण्याचा प्रयत्न नागरिक करीत आहेत. त्याचाच फायदा घेत अकोला महानगपालिकेच्या हद्दीत घरातून मत्स्य विक्री सुरू केली होती.

अकोला : सलग 41 दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मांसाहारींची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे मिळेल तेथून मांस किंवा मासोळी मिळविण्याचा प्रयत्न नागरिक करीत आहेत. त्याचाच फायदा घेत अकोला महानगपालिकेच्या हद्दीत घरातून मत्स्य विक्री सुरू केली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर ही कृती विषाणूच्या समूह संसर्गाच्या धोका वाढविणारी असल्याने मनपा प्रशासनातर्फे विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली.

मनपाच्या पूर्व क्षेत्रांतर्गत निबंधे प्‍लॉट, मालवीया गॅस गोडाऊन जवळ केवट हे त्‍यांच्‍या राहत्‍या घरातून बिना परवानगीने मत्‍स्‍य (मच्‍छी) विक्रीचा व्‍यावसाय करीत असल्याची तक्रार महानगरपालिकेकडे करण्यात आली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असताना विनापरवानगीने सुरू असलेला हा व्यवसाय विषाणू संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरणार होता. त्यामुळे मनपाने व्यावसायिकाच्या घरच्या मासोळ्या व साहित्‍य जप्त केले. ही कारवाई मनपा आरोग्‍य विभाग व अतिक्रमण विभागामर्फत करण्यात आली.

 

मासोळी खवय्यांची झाली पंचायित
अकोला शहरात मासोळी खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शहरात दोन ठिकाणी मत्स विक्रीचा बाजार भरतो. सध्या हे दोन्ही बाजार कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याने बंद आहेत. उघड्यावर मांस विक्री बंद करण्यात आली. त्यामुळे मासोळी खवय्यांची चांगलीच पंयाचित झाली. त्यामुळे त्यांनी थेट मत्स उत्पादन करणाऱ्याचे घर गाठले. दोन पैसे मिळविण्याच्या उद्देशाने घरूनच मस्त विक्री सुरू केली.

 

होलसेल बाजारातही कारवाई
मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगरपालिका अतिक्रमण विभागाव्‍दारे शहरातील होलसेल किरणा बाजार येथील व्‍यावसायिकांव्‍दारे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्‍लंघन केल्‍याने व्यावसायिकांवर प्रत्‍येकी दोन हजार रुपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली. ही कारवाई मनीष ट्रेडर्स, कन्‍हैयालाल व हरिषकुमार हरपालराम या व्यावसायिकांवर करण्यात आली.

तर प्रतिष्ठान कायमस्वरूपी बंद
शहरातील सर्व जीवनावश्‍यक वस्‍तू विक्री करणाऱ्या व्‍यावसायिकांनी सामानाची विक्री करतांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच सामानाची विक्री करावी. या नियमाचे उल्‍लंघन करताना आढळून आल्‍यास त्‍यांचे व्‍यावसायिक प्रतिष्‍ठाने बंद करण्‍यात येईल, असा इशारा महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the corona, it was completely closed, Then started selling fish from home