COVID19 : अखेर 'त्या' मुंबई रिटर्न मुलीला मिळाली रुग्णालयातून सुटी; या तालुक्यावरून संकट दूर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

आठ वर्षीय मुलीवर बुलडाणा येथील महिला रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू होते. भरती करून 10 दिवस झाल्यानंतर, तिला ताप व अन्य कुठलीही लक्षणे नसल्यामुळे केंद्र सरकारच्या नवीन निर्देशाप्रमाणे दुसरा स्वॅब न पाठवता त्या मुलीला आज डिस्चार्ज देण्यात आला.

बुलडाणा : मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील एकमेव कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मुलीला सुट्टी झाल्याने हा तालुका कोरोनामुक्त झाला आहे.
मुंबईच्या जे. जे. रुग्णालयातून किडनीच्या आजारावरील उपचारानंतर सदर मुलगी गावी मलकापूर पांग्रा येथे परतली होती. मात्र, त्यानंतर तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली होती.

त्या आठ वर्षीय मुलीवर बुलडाणा येथील महिला रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू होते. भरती करून 10 दिवस झाल्यानंतर, तिला ताप व अन्य कुठलीही लक्षणे नसल्यामुळे केंद्र सरकारच्या नवीन निर्देशाप्रमाणे दुसरा स्वॅब न पाठवता त्या मुलीला आज डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रेमचंद पंडित व आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आवश्यक वाचा - अरे वा! गावाच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत

याआधी तिच्या संपर्कातील 23 जण निगेटिव आलेले आहेत. त्यात तिच्या आई-वडिलांचाही समावेश आहे. त्यामुळे मलकापूर पांग्रा परिसरावरील फार मोठे संकट टळले आहे. मुंबईहून आलेल्या या मुलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याची माहिती मिळाल्यानंतर सिंदखेड राजा तालुका व जिल्ह्यात खळबळ उडाली होती. यानंतर पोलिस प्रशासनाने पांगरा परिसर पूर्णपणे सील केला होता. 

कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील व्यवहारावरही मोठे निर्बंध आणले होते. या परिसरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत होती. सदर मुलीला आज सुट्टी झाली असल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally, the mumbai returned girl and was discharged from the covid hospital