‘घरवापसी’ने वाढतेय प्रशासनाची चिंता; शेकडोत नव्हे तर हजारांमध्ये आहे संख्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

आजवर 11 हजार 850 पेक्षा जास्त इच्छुकांना जिल्हा प्रशासनाने आपल्या घरी परत जाण्याची परवानगी दिली आहे. तर अनधिकृत माहितीनुसार सुमारे 72 हजार नागरिक जिल्ह्यात आले असल्याची माहिती ग्रामीण भागातून मिळत आहे.

बुलडाणा : घर वापसी अर्थात बुलडाणा जिल्ह्यातून आपल्या घरी जाणारे व इतर ठिकाणांहून आपल्या बुलडाण्यातील घरी येणारे. अशा नागरिकांची संख्या काही हजारांमध्ये असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि त्यांची तपासणी करणे अशी दुहेरी चिंता प्रशासनाची दिवसेंदिवस वाढत आहे.

प्राप्त माहितीनुसार, आजवर 11 हजार 850 पेक्षा जास्त इच्छुकांना जिल्हा प्रशासनाने आपल्या घरी परत जाण्याची परवानगी दिली आहे. तर अनधिकृत माहितीनुसार सुमारे 72 हजार नागरिक जिल्ह्यात आले असल्याची माहिती ग्रामीण भागातून मिळत आहे. यामुळे या सर्व लोकांवर कसे लक्ष ठेवायचे आणि त्यांच्याबाबत काय खबरदारी घ्यायची ही सर्वात मोठी समस्या प्रशासनासमोर व आरोग्य विभागा समोरही आहे. 

महत्त्वाची बातमी - अजितदादांच्या वरदहस्ताने तोंडदाबून बुक्यांचा मार; या जिल्ह्यात राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस

नुकतेच मलकापूर पांग्रा येथे मुंबईतून आलेली एक रुग्ण मुलगी पॉझिटिव्ह आढळल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिवाय अनेक जण परवानगी न घेताच जिल्ह्यातून बाहेरही जातात व परत जिल्ह्यात  येत आहेत. नुकतेच जळगाव जामोद येथून एका अंत्यसंस्कारासाठी बऱ्हाणपूरला काहीजण गेल्याचे प्रकरण ताजे आहे. बाहेर जिल्हा तर सोडाच परंतु परराज्यातही नागरिक विनापरवानगीने छुप्या मार्गांनी जात असल्यामुळे ही सर्वात मोठी चिंता प्रशासनासमोर आहे. 

आवश्यक वाचा - अहो आश्चर्यम! वाशीमच्या नवदाम्पत्यांनी वाचविले ९० कोटी

नुकतेच काही निर्बंध शिथिल करण्यात आल्याने प्रशासन अनेकांना आपल्या घरी जाण्याची परवानगी देत आहे. बुलडाण्यातून जाण्याची परवानगी दिलेल्यांची नोंद होते, मात्र जिल्ह्यात कुठून किती जण आले याची गांभीर्याने नोंद होते की, नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात बाहेरून येणाऱ्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. त्यांना गावाबाहेर किंवा शाळेत क्वारंटाईन करण्यात येते. परंतु शहरांमध्ये येणाऱ्यांच्या बाबतीत अशी कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे दिसत असल्याने दिवसेंदिवस प्रशासनास समोरील चिंता वाढत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homecoming Citizen raises growing administration concerns in buldana district