मैं कोरोना हू, बुलाता हू, मगर आने का नहीं; यांची अफलातून शक्कल!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

महिनाभरापासून कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनसह संचारबंदी आहे. त्यामुळे अनेकवेळा रस्त्यावर विनाकारण पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसादही दिला जात आहे.

घाटबोरी (जि.बुलडाणा) : कोरोना विषाणूंच्या लढाईत शासन सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु, काही टवाळखोर आजही रस्त्यावर विनाकारण फिरतांना दिसत आहे. कोरोना विषाणूसोबत मुकाबला करण्यासाठी घरातच थांबणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमिवर मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथील युवक योगेश पवार व गौतम अंभोरे यांनी नामीशक्कल लढवली असून, सांगूनही न समजण्यासाठी बुजगावण्याच्या माध्यमातून अफरातून संदेश दिला आहे. बुजगावणे तयार करून ते दुकानाच्या कॉर्नरवर अडकावून त्यावर मैं कोरोना हू, बुलाता हू, मगर आने का नहीं ! असा संदेश दिल्याने हे बुजगावणे परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

महिनाभरापासून कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनसह संचारबंदी आहे. त्यामुळे अनेकवेळा रस्त्यावर विनाकारण पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसादही दिला जात आहे. तसेच अनेकांच्या तालुक्यात दुचाकी जप्त करण्यात आल्या. तरी अनेक हौशी रस्त्यावर फिरत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. एकीकडे व्यापक स्वरूपात जनजागृती केली जात असली तरी काही नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ,पोलिसांना नाइलाजाने दंडुक्याचा वापर करावा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

आवश्‍यक वाचा - ...या गावाने टाळली बँकेत होणारी गर्दी; कोरोनाच्या लढ्यात गावाचे नाव पोहचले दिल्लीपर्यंत

सर्व बाबीचा विचार करून घाटबोरी येथील युवक योगेश पवार , गौतम अंभोरे यांनी बसस्टॅडवर घाटबोरी गट ग्रामपंचायत चे सरपंच गजानन चनेवार , उपसरपंच सुभाष नवले, पत्रकार संतोष अवसरमोल, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गजानन मोरे, शेषराव अंभोरे, अजय अंभोरे,अनिल गवळी, किशोर दोडेवार, देवराव नवले, यांच्या उपस्थितीत, बुजगावण मार्फत जनजागृतीचा संदेश दिला. घाटबोरी येथील काही सुज्ञ नागरिकांना दंडुक्याचीही भाषा कळत नाही,अशांना बुजगावण्याच्या माध्यमातून अफरातून सल्ला योगेश पवार यांनी देण्याचे काम केले.

हेही वाचा - अरे वा! लग्न लागले मात्र, मंगलाष्टकात नव्हे तर राष्ट्रगीताने

सोशल मीडियाचा ट्रेंड पकडला
महिना भरापूर्वी सोशल मीडियात बुलाती है, मगर जाने का नही, या गाण्याचा ट्रेंड चालला होता. तोच ट्रेंड उचलत घाटबोरी येथील युवकांनी बुजगावण्यावर संदेश देत लोंकाना घराबाहेर निघू नका या साठी जनजागृती केली आहे. मैं कोरोना हूँ, बुलाता हूँ, मगर आने का नहीं, असा संदेश दिल्याने परिसरातील नागरिकांचे याकडे लक्ष्य वेधून जात आहे. गंभीरतेने सांगूनही नागरिकांना पटत नसलेल्या अनेक गोष्टी विनोदी पद्धतीने सांगितल्याने सहज पटतात. याचीच प्रचिती घाटबोरी गट ग्रामपंचायतमध्ये पाहावयास येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am Corona, I call, but not to come; Awesome ideas in buldhana district