Lockdown : मुंबई, पुणे सारख्या महानगरांतून येणार्‍यांकडे पाहण्याची दृष्टीच बदलली; अशी दिली जातेय वागणूक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

कोरोना या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी गर्दी टाळणे खूप गरजेचे आहे. मात्र, दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच महानगरांत कामानिमित्त गेलेल्या नागरिकांच्या हातचा रोजगारही हिरावला गेला आहे.

वाशीम : सध्या संपूर्ण राज्य कोरोनाशी मुकाबला करीत आहे. दरम्यान या काळात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रितसर परवानगी घेऊन महानगरांतून नागरिक गावाकडे परत येत आहेत. मात्र, महानगरातून आलेला प्रत्येकच व्यक्ती कोरोना बाधितच असल्यागत त्यांच्याकडे पाहिल्या जात आहे. मात्र, ते सुद्धा आपल्याच गावचे नागरिक आहेत. ही बाब विसरल्यागतच वाटत आहे.

कोरोना या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी गर्दी टाळणे खूप गरजेचे आहे. मात्र, दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच महानगरांत कामानिमित्त गेलेल्या नागरिकांच्या हातचा रोजगारही हिरावला गेला आहे. त्यामुळे हाताला काम नसतानाही घरभाडे खिशातून देण्याची वेळ येत आहे. ही बाब पाहता अनेकजण गावाकडे परत येत आहेत. या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना 14 दिवस वेगळे ठेवले जात आहे. याकरिता गावातील जिल्हा परिषद, महाविद्यालयांमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.

आवश्यक वाचा - साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असता तर, आमच्यावर ही वेळ आली नसती; चक्क पोलिस कर्मचाऱ्याने देवेंद्र फडणवीस
यांच्यासमोर...

तर काही गावांमध्ये जागा नसेल तर, शेतामध्ये झाडाखाली राहण्याची व्यवस्था ग्राम समितीकडून केली जात आहे. मात्र, महानगरांतून येणार्‍या नागरिकांकडे वेगळ्याच तिरस्काराच्या नजरेने पाहिल्या जात आहे. यामध्ये सुज्ञ नागरिकांचा देखील सहभाग असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महानगरातून आलेला प्रत्येकच व्यक्ती कोरोना बाधित नाही. ही बाब पाहता चांगली वागणूक देण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा - चौथ्या लाॅकडाउनमध्ये अशी राहील परिस्थिती; या जिल्ह्यात पासेसना 31 मे पर्यंत मुदतवाढ

सहकार्य करूनही तिरस्कार कशासाठी?
महानगरातून आलेले नागरिक प्रथमतः आपली आरोग्य तपासणी करून घेतात, 14 दिवस वेगळे राहण्याची जेथे व्यवस्था असेल तेथे राहतात. कुणालाही काही त्रास असेल तर ग्राम समितीला कळविल्या जाते. मग, तिरस्कार कशासाठी? असा प्रश्‍न महानगरांतून परतलेल्यांमधून उपस्थित केला जात आहे.

अशी आहे स्थिती
गृह विलगीकरण .........41
संस्थात्मक विलगीकरण..17
अलगीकरण कक्ष ........08
तपासलेले एकूण स्त्राव..108
पॉझिटिव्ह अहवाल .....03
निगेटिव्ह अहवाल...... 98
अहवाल अप्राप्त ........ 07

निगेटिव्ह आलेले अहवाल
रविवारी (ता.17) चार अहवाल ‘निगेटिव्ह’ आले. या चार पैकी तीन व्यक्तींना ‘सारी’ची लक्षणे असून एका व्यक्तीला ‘आयएलआय’ची लक्षणे आहेत. यापैकी ‘सारी’ची लक्षणे असलेल्या दोन व्यक्ती कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित दोन व्यक्तींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It has changed the way we look at people coming from metros like Mumbai and Pune