esakal | ‘सोशल डिस्टन्स’चा कृषी विभागाकडूनच भंग, कोरोना विरुद्धची लढाई सोडून सुरू केली पाणलोटाची कामे

बोलून बातमी शोधा

Leaving the battle against Corona began the work of sailing

संपूर्ण जग हे कोरोना विरुद्धच्या लढाईत गुंतले असताना जळगाव जामोद तालुक्यातील पोलिस, महसूल, आरोग्य, विद्युत वितरण विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी अहोरात्र जनतेला आपली सेवा समर्पित करीत आहेत. परंतु कृषी विभाग मात्र हे सर्व सोडून पाणलोटाची कामे सुरू ठेवून 31 मार्चपूर्वी पैशांची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत आहे.

‘सोशल डिस्टन्स’चा कृषी विभागाकडूनच भंग, कोरोना विरुद्धची लढाई सोडून सुरू केली पाणलोटाची कामे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव  जामोद (जि.बुलडाणा) : संपूर्ण जग हे कोरोना विरुद्धच्या लढाईत गुंतले असताना जळगाव जामोद तालुक्यातील पोलिस, महसूल, आरोग्य, विद्युत वितरण विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी अहोरात्र जनतेला आपली सेवा समर्पित करीत आहेत. परंतु कृषी विभाग मात्र हे सर्व सोडून पाणलोटाची कामे सुरू ठेवून 31 मार्चपूर्वी पैशांची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत आहे.

कृषी विभागाच्या पाणलोटच्या कामावर कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या समक्ष पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव असतो, शासकीय यंत्रणा सोशल डिस्टन्स या संकल्पनेचा भंग करीत आहे. त्यामुळे जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. नव्याने रुजू झालेले तालुका कृषी अधिकारी वाकोडे यांनी 26 मार्च रोजी तालुक्यातील गणेश कराळे, सुरेश देवचे, श्रीकृष्ण आढाव आणि प्रमोद आढाव या जेसीबी धारक कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश दिलेली कामे तत्काळ पूर्ण करावी, अन्यथा कार्यारंभ आदेश रद्द करण्यात येईल अशी लेखी तंबी दिली आहे.

सध्या पेट्रोल पंपावर संचार बंदीच्या काळात पेट्रोल भरणाऱ्यांची फार गर्दी असते अशाही परिस्थितीत वरील चार कंत्राटदारांना डिझेल उपलब्ध करून देऊन त्यांना डिझेल वाहतुकीदरम्यान आडकाठी आणू नये ,असे पत्रसुद्धा तालुका कृषी अधिकारी यांनी दिल्याने कृषी विभागाला कोरोणाचे काही सोयरसुतक नाही असे सिद्ध होते.

 संचारबंदी असताना पाणलोटची कोणतीही कामे सुरू करण्याचे आदेश नाही. शेतकऱ्यांनी त्यांची व्यक्तिगत पातळीवरची शेततळे ते पूर्ण करू शकतात. आमच्या स्तरावरून कोणत्याही कृषी सहाय्यकाला किंवा अधिकाऱ्याला अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सचा भंग करून सिमेंट नाला बांध किंवा अन्य कोणतीही कामे करण्याचे आदेश दिलेले नाहीत.
- दीपक पटेल, उपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव

कृषी विभागाला समज देण्यात येईल : तहसीलदार डॉ.मगर
महसूल विभागासह सर्वच शासकीय निमशासकीय यंत्रणा कोरोना विरुद्धच्या लढाईत गुंतले आहेत. पोलिस व आरोग्य कर्मचारी अहोरात्र आपली सेवा समर्पित करीत आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाचे सुद्धा काय योगदान हवे. कृषी विभागाकडून सोशल डिस्टन्स मर्यादेचा भंग होत असल्याचे आताच ऐकले, असे जर असेल तर त्यांना त्याबाबत समज देण्यात येईल असे तहसीलदार डॉ. शिवाजीराव मगर यांनी सांगितले.

गारपिटीच्या सर्व्हेकडे पण कृषी विभागाचे दुर्लक्ष
तालुक्यात 17 मार्च रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीने प्रचंड नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश झाले असले तरी फक्त महसूल विभागाच्या तलाठ्यांनी काळजीपूर्वक पाहणी करून पंचनामे केले. कृषी विभाग मात्र 31 मार्चचे निमित्त काढून पाणलोटाची कामे करण्यातच मग्न होता. ‘सोशल डिस्टन्स’चा पंतप्रधानांनी सुद्धा आवर्जून उल्लेख केला आहे. तरी कृषी विभाग मात्र गांभीर्याने घेत नसून जनतेच्या जीवाशी खेळत आहे.