COVID19 : या महानगरपालिका हद्दीत प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी; आयुक्तांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महानगरपालिका हद्दीत प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महानगरपालिका हद्दीत प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम हाती घेतली आहे. ही मोहिम गुरुवार, ता.28 मे ते बुधवार, ता.3 जून या कालावधीत अकोला महानगरपालिका हद्दीत राबविली जाईल, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

भविष्यात पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता आजारांचा अधिक फैलाव होण्याआधी ही तपासणी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी अकोला महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्रासहित सर्व क्षेत्रात युद्धपातळीवर ‘कुटुंबनिहाय सर्व व्यक्तींची आरोग्य तपासणी मोहीम’ राबविण्यात येणार आहे. या तपासणीत प्रतिबंधित क्षेत्र, झोपडपट्टी क्षेत्र, प्रतिबंधित क्षेत्राला लागून असलेले क्षेत्र, या व्यतिरिक्त मनपा हद्दीतील क्षेत्र या सर्व ठिकाणी मनपामार्फत नियुक्त आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी, शहराचे चार झोन (पूर्व, पश्चिम, उत्तर,दक्षिण) करून त्यात वैद्यकीय तपासणी होईल.

आवश्यक वाचा - अरे देवा! कोरोनामुळे या जिल्ह्यात एकाच दिवशी तीन मृत्यू; 20 पाॅझिटिव्ह

तपासणीचे दैनंदिन अहवाल एकत्र संकलित करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले जातील. या तपासणीत आढळणारे कोविड बाधित, अन्य दुर्धर आजारांनी ग्रस्त व्यक्ती यांची स्वतंत्र यादी करण्यात येईल. त्या-त्या भागातील दवाखाण्यांना भेटी देऊन दवाखाण्यात भरती रुग्णांची माहिती घेणे, फळविक्रेते, भाजी विक्रेत, दूध वितरण करणारे यांची प्राधान्याने तपासणी करण्यात येईल.

 

मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती
मनपा हद्दीतील नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचे सहअध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. तर मनपा आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव असून, अन्य सदस्यांत उपविभागीय अधिकारी अकोला व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical test for each and every family member in Akola City