esakal | Lockdown : महाराष्ट्राच्या या शहरातील सुप्रसिद्ध खवा नामशेष होण्याच्या मार्गावर; गुजरातच्या भेसळयुक्त बर्फीने...
sakal

बोलून बातमी शोधा

khava in nandura.jpg

नांदुरा तालुक्याला खवा व पेढा व्यवसायामुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली. धवलक्रांतीच्या दिशेने पुढचे पाऊल म्हणजे अनेकांना या व्यवसायाने शेतीला एक पूरक जोडधंदा उपलब्ध केला असून शुद्धतेमुळे दूरपर्यंत तालुक्याचे नाव उज्वल झाले आहे.

Lockdown : महाराष्ट्राच्या या शहरातील सुप्रसिद्ध खवा नामशेष होण्याच्या मार्गावर; गुजरातच्या भेसळयुक्त बर्फीने...

sakal_logo
By
विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (जि.बुलडाणा) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटल्याने नांदुरा येथील शुद्ध खव्यावर त्याचा परिणाम झाला असला तरी त्याअगोदरच्या काळात परराज्यातील स्वस्त असलेल्या भेसळयुक्त बर्फीने नांदुरा येथील प्रसिद्ध खव्याला संकटात टाकल्याने शेकडो खवा व्यावसायिक हा व्यवसाय परवडत नसल्याच्या कारणातून यातून अंग काढत आहे. नांदुरा येथील प्रसिद्ध खवा नामशेष होतो की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाकडून सुविधाही मिळत नसून दुभत्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस घटत चालल्याने तोट्याच्या व्यवसाय सद्या न परवडणारा झाला आहे.

हेही वाचा - पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा सोडला वाऱ्यावर, जबाबदारीचे भानही विसरले

नांदुरा तालुक्याला खवा व पेढा व्यवसायामुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली. धवलक्रांतीच्या दिशेने पुढचे पाऊल म्हणजे अनेकांना या व्यवसायाने शेतीला एक पूरक जोडधंदा उपलब्ध केला असून शुद्धतेमुळे दूरपर्यंत तालुक्याचे नाव उज्वल झाले आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून नांदुरा येथील प्रसिद्ध खव्याला परराज्यातील स्वस्तात उपलब्ध होणारी भेसळयुक्त बर्फीची स्पर्धा निर्माण केली गेल्याने पैसे कमविण्याच्या नादात शुद्धतेचा येथील खवा अडचणीत सापडला आहे. सद्या कोरोना संक्रमणाचे सावट संपूर्ण देशावर असून लॉकडाउनमुळे दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटल्याने येथील खवा मार्केट संकटात असून, साठवणुकीची कोणतीही सुविधा या खवा व्यवसायिकांकडे नसल्याने हा व्यवसाय सद्या अनेकांनी बंद ठेवला आहे.

आवश्यक वाचा - चिंताजनक! या जिल्ह्याच्या कोरोनामुक्तीच्या आनंदावर काही तासातच विरजन

गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण भारतातील एकमेव बाजारपेठ नांदुरा येथे रेल्वे स्टेशन यार्डात सकाळी सकाळी भरत असून, दररोज जवळपास १० हजार क्विंटल खवा हा विदर्भ, मराठवाड्यासह मध्यप्रदेशातील अनेक शहरात रेल्वेने रोज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हॉटेलपर्यंत पोहचत असतो. नांदुरा येथील नावावर चालणाऱ्या या खव्याची शुद्धता अजूनही कायम टिकून असून, काही विघ्नसंतोषी लोकांनी याला स्पर्धा निर्माण करत अहमदाबाद येथील भेसळयुक्त व स्वस्त दरात बर्फी (पेढा) उपलब्ध करून या व्यवसायाला अवकळा प्राप्त करण्याचा पर्याय उपलब्ध केल्याने येथील व्यवसायिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

गुजरातमधून येणाऱ्या बर्फीने टाकले संकटात
गेल्या काही वर्षांपासून गुजरात राज्यातून 10 किलोमध्ये पॅकिंग केलेला भेसळयुक्त (बर्फी) पेढा अतिशय कमी दरात येथे विक्रीला आणला जात आहे.
कमी भाव असल्यामुळे अनेक हॉटेल मालक त्या मालाच्या खरेदी करित आहेत. या गुजरात अहमदाबाद वरुण येणारा भेसळयुक्त मालाला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

कोरोनानेही चिंता वाढविली़
आज कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण देश लॉकडाउन असल्याने खवा व दूध उत्पादक शेतकरी आधिकच भरळला जात आहे. साठवणुकीच्या अभावी हजारो किलो खवा व पेडा नष्ट करावा लागला आहे. खवा व्यावसायिकांचे हजारो लिटर दुध वाया जात असून, दुध अक्षरक्षः फेकून द्यावे लागत आहे. खासगी डेअरी वाले काही दिवसांकरिता सुद्धा खवा व्यावसायिकांकडील दुध तात्पुरते खरेदी करण्यास तयार नाहीत. त्यांना कायमस्वरुपी दुध हवे आहे. ते कायम स्वरुपी दुध देण्याच्या अटीवर दुध खरेदी करण्यास तयार आहेत. त्यामुळे खवा व्यवसाय संपवयाचा त्यांचा डाव आहे का अशी शंका पण येत आहे.

नांदुरा येथील खवा क्लस्टर बांधणी प्रकल्पही रखडला
मध्यंतरीच्या काळात 2015 मध्ये लोणवाडी जवळील खंडाळा फाट्याजवळ क्लस्टर प्रकल्प निश्चित झाला होता. बुलडाणा जिल्हा उद्योग केंद्राचे पुढाकाराने महाराष्ट्र शासनाच्या एमएसआयसीडीपी प्रकल्पाअंतर्गत शासनाचे 80 टक्के अनुदानावर महारुद्रा क्लस्टरची स्थापनापण झाली होती. परंतु  शासनाकडून मिळणारी 80 टक्के रकक्म ही शेवटच्या टप्प्यात मशीनरी खरेदीसाठी मिळणार असल्याने क्लस्टर बांधणीच्या आरंभी शासनाकडून एक रुपयाचाही निधी मिळाला नाही. यातील सर्व खवा व्यावसायिक हे सर्व शेतकरी असल्याने सततचा दुष्काळ व नपिकी यामुळे क्लस्टरचे सदस्य हे बांधकाम पूर्ण करू शकले नाहीत.

अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
गुजरात राज्यातून येणाऱ्या भेसळयुक्त मालाला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून, येथील खवा व्यावसायिकांना खवा साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज, वातानुकुलित वाहन व टेस्टिंग लॅब उपलब्ध करून देण्यासोबतच क्लस्टर बांधणीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा व हा व्यवसाय दीर्घकाळ टिकण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- संजय चोपडे, खवा व्यावसायिक, लोणवाडी.