आता हे शहर पोहचलंय समूह संक्रमणाच्या उंबरठ्यावर, प्रशासनाला घ्यावी लागेल कठोर भूमिका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

- संक्रमण टाळण्यासाठी कडेकोट बंदच शेवटचा पर्याय
- संक्रमणाची साखळी खंडीत केल्याशिवाय रुग्ण संख्येवर नियंत्रण अशक्य
- नागपूरच्या धर्तीवर प्रशासनाला घ्यावी लागणार कठोर भूमिका

अकोला : अकोला महापालिका क्षेत्रातील ६०पेक्षा अधिक परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरच कोरोनाच्या सावटाखाली सापडले असून, समूह संक्रमणाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. संक्रमणाची ही साखळी खंडीत करण्यासाठी नागपूर महापालिकेच्या धर्तीवर अकोल्यातही आता कडेकोट बंद करण्याची वेळ आली असून, जिल्हा प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

अकोला शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, पॉझिटिव्ह अहवालांची संख्या साडेतीनशेच्या घरात पोहोचली आहे. शहराच्या बहुतांश भागातील कोणता ना कोणता परिसर कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे सील करण्यात आला आहे. त्यानंतरही प्रशासनाकडून समूह संक्रमण अकोल्यात सुरू झाले नसल्याचा दावा केला जात आहे.

बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती प्रशासनातर्फे कॉन्टॅक्ट रेसिंगच्या माध्यमातून शोधून काढल्या जात असल्यामुळे रुग्णांची संख्या वाढती दिसत असली तरी हे समूह संक्रमणाची सुरुवात नसल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे. असे असले तरी शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या बघता व सील करण्यात आलेल्या परिसराची संख्या बघता समूह संक्रमणाच्या उंबरठ्यावर अकोला येऊन पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण आहे. मात्र लोकांच्या जगण्याचा प्रश्न असल्यामुळे रस्त्यावर होणारी गर्दी काहीही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही.

वाढती रुग्ण संख्या बघता ही गर्दी धोक्याचे संकेत देत आहे. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आठ-पंधरा दिवसांचा एक मोठा ब्रेक घेण्याचा कठोर निर्णय प्रशासनाला लवकरच घ्यावा लागेल. पुढचे आठ दिवस अकोला शहरासाठी महत्त्वाचे असल्याने नागपूर महापालिकेच्या धर्तीवरच अकोल्यातही कठोर उपायोजना करून रुग्णसंख्या नियंत्रित आणावी लागणार आहे.

नागरिकांनाही हवा आहे बंद
अकोल्यातील वाढती रुग्ण संख्या व प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या थोडक्या उपाययोजना बघता नागरिकांना आता कोरोना आपल्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला असल्याची भीती वाटत आहे. त्यामुळे नागरिकांनी ही सोशल माध्यमातून व्यक्त होत एकदाचा आठ-पंधरा दिवसांचा बंद करून संक्रमणाची साखळी खंडीत करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. जिल्हा प्रशासन त्यांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून तातडीने ठोस उपाययोजना करेल, अशी अपेक्षा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Akola has reached the threshold of mass transition, the administration will have to take a tougher stance